श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांद्याच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा

Edited by: विनायक गांवस
Published on: January 20, 2026 20:18 PM
views 7  views

सावंतवाडी : शिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मुलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. याची सविस्तर माहिती गंधर्व फोटो स्टुडिओ येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यामध्ये चित्रकला, रंगभरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शिवगीत गायन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा अशा विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ही संस्था दर वर्षी विविध स्पर्धा घेत असते. चित्रकला व रंगभरण स्पर्धा ही रविवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत होणार आहे. अंगणवाडी ते इयत्ता पहिली, इयत्ता दुसरी ते इयत्ता चौथी, इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी व इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी व अकरावी ते खुला अशा पाच गटात ही स्पर्धा होणार आहे.

यात पहिल्या तीन गटासाठी रंगभरण तर मोठ्या गटासाठी 'शिवरायांच्या जीवनातील एक प्रसंग' हा विषय ठेवण्यात आला आहे. तर खुल्या गटासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोर्ट्रेट हे विषय ठेवण्यात आले आहेत. ही स्पर्धा पीएमश्री केंद्रशाळा बांदा नं १ येथे होणार आहे. सर्धेच्या अधिक माहितीसाठी 9422394075 येथे संपर्क साधावा.

शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ९ वाजता येथील बांदा केंद्रशाळेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता दुसरी ते चौथी गटासाठी 'शिवरायांच्या नितिमूल्यांची कथा‘ हा विषय ठेवण्यात आला आहे. यासाठी ३ ते ४ मिनिटे वेळ आहे. इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी या गटासाठी 'संस्काराचे व्यासपीठ राजमाता जिजाऊ' आणि 'स्त्री सन्मान आणि छत्रपती शिवराय‘ हे विषय ठेवण्यात आले आहेत. यासाठी ५ ते ६ मिनिटे वेळ आहे. तर इयत्ता नववी ते इयत्ता बारावी या गटासाठी 'छत्रपती शिवाजी महाराजांचे न्यायव्यवस्थेतील योगदान' व ‘पर्यावरण रक्षक छत्रपती शिवाजी महाराज’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. यासाठी ६ ते ७ मिनिटे वेळ मर्यादा आहे. खुल्या गटासाठी ‘शिवरायांचे विचार आणि युवा भारत’ व छत्रपती शिवाजी महाराजांचा आजच्या काळातील वापर विचारासाठी की राजकारणासाठी‘ हे विषय ठेवण्यात आले असून यासाठी वेळ मर्यादा ८ ते १० मिनिटे ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी 8668485646 किंवा 9763717790 यांच्याशी संपर्क साधावा.

रविवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत शिवगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी व खुला अशा तीन गटात होणार आहे. तिन्ही गटासाठी शिवगीत गायन हा विषय आहे. (स्पर्धेसाठी पोवाडा ग्राह्य धरला जाणार नाही).

गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता मुख्य सोहळ्याचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाल्यानंतर वेशभूषा स्पर्धा होणार आहे. तसेच विश्वकला मंच ग्रुपचे बहारदार ऐतिहासिक सादरीकरण होणार आहे. वेशभूषा स्पर्धा ही अंगणवाडी, पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी व सातवी ते दहावी या गटात होणार आहे. यासाठी शिवकालीन वेशभूषा हा विषय ठेवण्यात आला आहे. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी केदार कणबर्गी (मो. 9422394075), संकेत वेंगुर्लेकर (मो. 9011107562) किंवा शुभम बांदेकर (मो. 9403489568) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत, संकेत वेंगुर्लेकर, जे डी पाटील, नारायण बांदेकर, अनुप बांदेकर, शुभम बांदेकर, प्रथमेश राणे, कांता हळदणकर, वामन हळदणकर, अक्षय मयेकर, अनुज बांदेकर, तात्या स्वार, तनिष मेस्त्री, सौ रीना मोरजकर आदी उपस्थित होते.