जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे‍ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 06, 2025 19:21 PM
views 163  views

सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे शिवस्वराज्य दिन, आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशव्दारामध्ये भगवा स्वराज्य ध्वजसंहितेनुसार ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक डॉ. माणिक दिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशक राजदंड व गुढीचे पूजनही करण्यात आले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, विशाल तनपुरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राज्यगीत आणि राष्ट्रगीताने झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक करून स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्र शासनाने २०२१ पासून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.