
वेंगुर्ला : शिवसेना तालुका महिला आघाडी वेंगुर्ला व होडावडा येथील "मिळुनी साऱ्या जणी महिला समुह" यांच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमेचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गावातील महिलांना वटवृक्षाचे वाटप करण्यात आले. तसेच वटवृक्षारोपणही यावेळी करून त्याच्या सवर्धनाचाही संकल्प करण्यात आला.
शनिवारी २७ जून रोजी होडावडा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. जून महिना संपत आला तरी अजुन हवा तसा पाऊस पडलेला नाही, त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आहे, काहीवेळा हा पाऊस पडला तर तो बेसुमार पडतो आणि शेतकऱ्यांचे नुकसान करतो, याला कारण एकच ते म्हणजे पर्यावरणाचे बिघडत चाललेले संतुलन आणि बेसुमार झालेली वृक्षतोड. भविष्यात हिच परिस्थिती राहिली तर कोकणचा मराठवाडा, विदर्भ व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून होडावडा गावातील मिळुनी साऱ्या जणी समूहाच्या च्या सर्व महिलांनी मिळून येत्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने केवळ वडाची पूजा करून न थांबता त्याची लागवड आणि संवर्धन करण्याचा संकल्प केला.
वडाचे झाड मोठ्या प्रमाणात वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड खेचून घेतो, जास्त ऑक्सिजन देतो आणि भुगर्भातील पाणी साठा वाढविण्यास मदत करतो. प्रदूषण रुपी यमा पासून सर्वांचे रक्षण व्हावे म्हणून आम्ही हा उपक्रम शिवसेना महिला आघाडीच्या साहाय्याने राबविला आहे. तसेच इतर उपक्रम राबवित असताना समाज हिताच्या दृष्टीनेही एक पाऊल पुढे टाकून प्रत्येकाने असे जनजागृती करणारे कार्यक्रम केले पाहिजेत असे यावेळी होडावडा माजी सरपंच अदिती नाईक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर आणि तालुका संघटक बाळा दळवी व महिला आघाडी पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी मिळूनी साऱ्या जणी गृपच्या सदस्या श्रिया मंगेश माणगांवकर या म्हणाल्या की, राजकारण आणि समाजकारण जेव्हा हातात हात घालून चालतं तेव्हा समाजाचं भलं होतं याचं उत्तम उदाहरण आज आपण बघतोय. शिवसेनेने संघटनशक्ती दिली आणि 'मिळूनी साऱ्या जणी'च्या माऊलींनी मायेची ऊब दिली. एकाने जागा उपलब्ध केली, दुसऱ्याने घराघरात झाड पोहोचवलं. झाड लावणं सोपं, पण ते वाटून लोकांच्या दारापर्यंत नेणं आणि "हे झाड तुझं आहे" ही भावना निर्माण करणं — हे काम फक्त महिला शक्तीच करू शकते. वृक्षारोपणासोबत घरोघरी झाडे वाटपाचा उपक्रम राबवून फक्त कार्यक्रम केला नाही, तर प्रत्येक कुटुंबाला निसर्गाशी जोडलं असेही माणगावकर म्हणाल्या.
कार्यक्रमासाठी होडावडा सरपंच रसिका केळुसकर, मिळुनी सार्या जणी समूहाच्या साक्षी नाईक, दिक्षा धावडे, संचिका पेडणेकर, मिताली नाईक, खुशी होडावडेकर, समीक्षा कुडाळकर, अदिती नाईक, श्रिया माणगावकर व गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.. पर्यावरण प्रेमी, कृषीमित्र व बेडूक संवर्धक मंगेश माणगावकर यांचीही विशेष उपस्थिती लाभली.










