'त्या' डॉक्टर विरुद्ध शिवसेना महिला आघाडी आक्रमक

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 23, 2023 15:48 PM
views 452  views

कणकवली : उपजिल्हा रुग्णालय येथे सध्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. अर्पिता आचरेकर या कार्यरत आहेत. मात्र, या रुग्णालयात येणा-या गरोदर मातांवर उपचार न करता त्यांना विनाकारण त्रास देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत. याबाबत आमच्याकडे अनेक महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत. डॉ. अर्पिता आचरेकर यांच्या उध्दटपणाच्या  वर्तणुकीमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटी पद्धतीने डॉ.आचरेकर या रुग्णालयात कार्यरत असुन त्यांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने केली आहे.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मालवण , कणकवली , वैभववाडी व कुडाळ अशा 4 तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात महिला प्रसुतीपुर्व तपासणी आणि प्रसुती उपचारासाठी दाखल होतात. मात्र त्या महिलांना डॉ. अर्पिता आचरेकर सेवेत असुन देखील उपचार करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दाखल रुग्णांना स्वत: तपासणी न करताच ओरोस किंवा कुडाळ या सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब महिलांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागल्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. याबद्दल महिला शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख प्रिया टेंबकर यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ. अनिकेत किर्लोस्कर यांना निवेदन दिले आहे.यावेळी उपजिल्हाप्रमुख सरीता राऊत उपस्थित होत्या. 


या निवेदनात, ज्या महिला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल होतात तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना घाबरवुन सिझेर करावे लागेल असा सल्ला डॉ. अर्पिता आचरेकर यांच्याकडून दिला जात आहे. त्याचा भुर्दंड नातेवाईकांना सोसावा लागत आहे. करारानुसार 24 तास सेवा देणे अपेक्षित असताना दिवसा किंवा रात्री आलेल्या रुग्णांची तपासणी करीत नाहीत. तसेच काही महिलांची प्रसुती केल्यास स्वत: लक्ष न देता सिस्टरकडून करुन घेतात. जर एखाद्या महिलेची प्रसुती सिझरद्वारे झाली असेल तर सहा दिवसानंतर पेशंट घरी सोडला जातो. पण तिस-या दिवशी त्या स्वत:च्या खाजगी क्लिनिकला संबंधित महिला रुग्णांना बोलवून ड्रेसिंग करण्यास भाग पाडतात. त्या गरीब रुग्णांकडून 2 हजार 500 रुपये आकारत आहे. तसेच त्या रुग्णांना बाहेरील औषधे आणण्यास प्रवृत्त करुन ती औषधे स्वत:कडे ठेवून घेतात. त्यानंतर सरकारी दवाखान्यातील औषधे वापरुन रुग्णांची फसवणूक केली जात आहे. याबाबत विचारणा केल्यावर उलट रुग्णांच्या नातेवाईकांना डॉ.आचरेकर धमकी देत माझी ओळख मंत्रालयात असल्याचे सांगुन रुग्णांना त्रास देत आहेत.  त्यामळे संबंधित डॉ.आचरेकर यांच्यावर कारवाई करत त्वरित नियुक्ती रद्द् करावी त्यांच्या जागी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नव्याने कंत्राटी पद्धतीने स्त्रीरोगतज्ञांची नियुक्ती करण्यात यावी असे म्हटले आहे.