
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना आता स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी पावशी विभागाच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये केले. या मेळाव्याला शिवसेना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. तर या मेळाव्यामध्ये अणाव व निरूखे गावातील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकवणार त्या भगव्या वादळाची पावशी जिल्हा परिषद मधून दमदार सुरुवात झाल्याच आमदार निलेश राणे यांनी गौरवोदगार काढले.
पावशी विभागाच्या शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा वेताळबांबर्डे येथे संपन्न झाला. यावेळी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, महिला सेना जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सचिव दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, आनंद शिरवलकर, महिला तालुकाप्रमुख वैशाली पावसकर, युवा सेना तालुकाप्रमुख अनिकेत तेंडोलकर, विभाग प्रमुख नागेश परब, महिला विभाग प्रमुख मृणाल परब, शहर प्रमुख अभिषेक गावडे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, माजी सभापती राजन जाधव, माजी पंचायत समिती सदस्य आनंद भोगले, कसाल सरपंच राजन परब, पणदूर सरपंच पल्लवी पणदूरकर, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, महिला उपतालुकाप्रमुख संगीता खांडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केले. पण आता महायुती होणे शक्य नाही. त्यामुळे आपल्याला स्वबळावर निवडणूक लढवावी लागेल. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला पक्ष जिंकला पाहिजे. यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेवर आपला भगवा झेंडा फडकला पाहिजे. हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन काम केले पाहिजे. आपली सुद्धा ताकद आहे ही दाखवली पाहिजे. असे सांगून आता आपल्या मतदारसंघात अनेक जण ही कामे मी आणली किंवा आमच्या माध्यमातून झाली असे सांगतील पण या मतदारसंघांमध्ये जी कामे झाली आहेत ती आमच्या माध्यमातून झाली आहेत. हे ठणकावून सांगा कारण या ठिकाणचा आमदार हा शिवसेनेचा आहे असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी आपल्याला भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवणे गरजेचे आहे. आणि आपली ताकद दाखवण्याचे आता वेळ आली आहे असे त्यांनी सांगितले.
तसेच ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्याने राणे परिवाराला भरभरून दिले आहे. यावर्षी खासदार आणि दोन आमदार राणे कुटुंबीयांना या जिल्ह्याने दिले आहेत. हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. पण आता निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम आम्ही करणार आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याने आपला उमेदवार निवडून आला पाहिजे. यासाठी मेहनत घेतली पाहिजे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख नागेश परब यांनी केले तर सूत्रसंचालन जिल्हा सचिव दादा साईल यांनी केले.










