शिवसेना शिंदे गटाची माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना ऑफर ?

बड्या नेत्यांनी केली कांदळगावकर यांच्याशी चर्चा ?
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 24, 2024 15:17 PM
views 542  views

मालवण : शिवसेना शिंदे गटाने अनेक पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांना संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उबाठा गटाला घरचा आहेर देणाऱ्या माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याशी शिंदे गटाने चर्चा केल्याची खात्रीलायक माहिती आहे. शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा निरीक्षक राजेंद्र फाटक यांनी कांदळगावकर यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उबाठा गटात नाराज असलेले महेश कांदळगावकर शिवसेना शिंदे गटात जाणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. 

लोकसभा निवडणुकी नंतर आता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. एकीकडे भाजपाकडून महायुतीचा नारा दिला असला तरी शिवसेना शिंदे गटाने राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघात पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून विधानसभा निवडणुकी बाबत चाचपणी करण्यात येत आहे. अनेक पक्षप्रवेश करण्याबाबत हालचाली सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाने दौरे करण्यास सुरुवात केली आहे. अनेक पक्षातील नाराजांना पक्षात घेण्याबाबत त्यांच्याशी चर्चा सुरु केल्याची माहिती मिळत आहे. 

मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर हे सध्या शिवसेना उबाठा गटात नाराज आहेत. नगराध्यक्ष पदावर असतानाही त्यांनी पक्षाचा राजीनामा देत जयमहाराष्ट्र केला होता. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी समजूत काढली होती. तरीही कांदळगावकर यांनी शहरातील समस्यांबाबत आवाज उठवला होता. मात्र, त्याकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीत तर शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी तर महेश कांदळगावकर यांच्यावर टीका केली होती. मात्र, त्यावर कांदळगावकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांचा पराभव झाला. त्यानंतर महेश कांदळगावकर यांनी हा पराभव आणि शहरात घटलेल्या मताधिक्याला विनायक राऊत, आमदार वैभव नाईक जबाबदार असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. तसेच शहरातील समस्यांबाबत खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचीही भेट घेतली होती. 

लोकसभा निवडणुकीत कांदळगावकर सक्रिय नव्हते. मात्र, आता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु होणार आहे. कांदळगावकर यांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. त्यामुळे त्यांना पक्षात घेण्याबाबत शिंदे गटाने चर्चा केल्याची खात्रीलायक माहिती आहे. शिवसेना शिंदे गटाचे पक्षनिरीक्षक राजेंद्र फाटक आणि पदाधिकाऱ्यांनी कांदळगावकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.