
दोडामार्ग : तळकोकणात दोडामार्ग तालुक्यातील सासोली गाव ड्रग्जचा अड्डा बनत असल्याची बाब दैनिक कोकणसाद ने अधोरेखित केल्यानंतर आता सामाजिक स्वाथ्य बिघडवणाऱ्या अशा गोरख धंद्यांना मुळासकट उखडून टाकण्यासाठी राजकिय व सामाजिक संघटना बरोबरच पोलिसही ॲक्शन मोडवर आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुका शिवसेनेने सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची भेट घेत लक्ष वेधलं असून दोडामार्ग येथील स्थानिक पोलिसांनी सुद्धा सासोली गावात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील तरूणांना ड्रग्ज, गांजा पुरविणा-या टोळीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. शिवाय दोडामार्ग तालुका हा गोवा - कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमा लागल्या असून कोल्हापूर जिल्ह्याची सीमा देखील तालुक्याला लागली आहे, त्यामुळे गोवा किंवा कर्नाटक राज्यातून ड्रग्स, गांजा अथवा अन्य अवैध वस्तूंची वाहतूक, विक्री होऊ शकते त्यामुळे दोडामार्ग तालुक्याच्या लोकसंख्येचा विचार न करता सीमेवरील तालुका हा निकष ठेवून जास्तीत जास्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करावी, अशी मागणी तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
याबाबत दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने थेट अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. त्यांनतर निवेदनही दिलं आहे. गेल्या आठवडयात दोडामार्ग तालुक्यात ड्रग्ज सेवन करताना दोघा तरुणांना पकडण्यात आले. त्यामुळे तालुक्यात तसेच जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तर मोठया प्रमाणात ड्रग्ज माफिया हे दिवसाढवळया ड्रग्ज पुरवितात आणि आज तालुक्यातील काही युवा पिढी या ड्रग्जच्या आहारी गेल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळात गोवा राज्य सीमेलगत असल्याने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांचे कनेक्शन असल्याचे दिसून येते. त्यातच स्टेट लेवलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सुद्धा हा मुद्दा अधोरेखित झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे यावर पूर्ण लक्ष असणे फार महत्त्वाचे आहे. पोलीस यंत्रणेने योग्य वेळी कारवाई न केल्यास या भागातील युवापिढीचे भवितव्य धोक्यात येणार आहे. तरुण पिढी व्यसनाधिन झाल्यास त्यांचे स्वास्थ्य बिघडून मृत्यूच्या छायेत जावू शकतात. याप्रवृत्तीचा पोलीस प्रशासने मुळासकट बिमोड करावा. दोडामार्ग तालुका गोवा सीमेवर असल्याने गोव्यातून येणाऱ्या चोरवाटा अनेक आहेत. त्यामुळे या भागातून जिल्हयात ड्रग्ज माफिया ड्रग्ज पुरवित असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या चोरवाटांवर पोलीस यंत्रणेची नजर असणे आवश्यक आहे. काही ठिकाणचे चेक पोस्ट कार्यान्वित करावे. जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुसंस्कृतपणा कायम रहावा व येथील तरुणाई व्यसनाधिन होवू नये. तालुक्यातून गोवा राज्यात जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्यांवर गस्त वाढवली पाहिजे. पोलीस कर्मचारी पुरविताना दोडामार्ग तालुक्यात निकष न ठेवता महाराष्ट्र राज्यातील सीमा ठेवून राज्याच्या कोठ्यातून पोलीस उपलब्ध करावे. ज्याप्रमाणे गुजरात व महाराष्ट्र सीमेवर पोलीस बंदोबस्त असतो. त्याप्रमाणे पोलीस बंदोबस्त वाढवावा. जेणेकरून गोवा राज्यात वाढणारी व्यसने व तस्करीचे प्रमाण महाराष्ट्रात होणार नाही. याची काळजी पोलीस यंत्रणेने घ्यावी. तसेच सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाने ड्रग्ज व माफिया टोळी हि आंतरराष्ट्रीय असून त्याचा शोध लावून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, तालुका संघटक गोपाळ गवस, तालुका युवासेना प्रमुख भगवान गवस, शहरप्रमुख योगेश महाले, विभागप्रमुख रामदास मेस्त्री उपस्थित होते.
पोलिसांची जनजागृती मोहीम
सासोली अंमली पदार्थांचा हॉट स्पॉट बनत असल्याचे पार्श्वभूमीवर आता येथील स्थानिक पोलीस सुद्धा सजग झाले असून मंगळवारी तेथील मंदिरामध्ये दोडामार्ग तालुक्याचे पोलीस निरीक्षक अरूण पवार आणि त्यांचे सहकारी यांनी अंमली पदार्थ विषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. शिवाय असे समाज विघातक अपप्रवृत्ती भावी पिढीसाठी हानिकारक असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे असेहि त्यांनी आवाहन केले. यावेळी सासोली गावचे प्रमुख दाजी गवस, सरपंच बळिराम शेटवे, पोलीस पाटील संजय गवस, मनोज गवस यांसह सासोली गावातील ६० ते ७० ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ऑनलाईन फ्रॉड व सोशल मिडिया पासूनही सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.