शिरगाव हायस्कूलच्या ९३-९४ बॅचचा स्नेहमेळावा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 17, 2025 18:44 PM
views 157  views

देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील शिरगाव हायस्कूल च्या ९३-९४ बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवार, १७ मे २०२५ रोजी भरविण्यात आला होता हा एक हृद्य आणि संस्मरणीय अनुभव ठरला. यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला

शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९९३-९४ या एस.एस.सी. बॅचचा स्नेहमेळावा एक हृद्य आणि संस्मरणीय अनुभव ठरला. आपल्या आयुष्याच्या वाटचालीत उंच भरारी घेतलेल्या या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आज आपल्या शाळेच्या प्रांगणात एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. आणि शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत एक लाख पन्नास हजार  रुपयांचा निधी शाळा इमारत नूतनीकरणासाठी सुपूर्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत शाळेचे चेअरमन विजयकुमार कदम, संस्था उपाध्यक्ष संभाजी साटम,शाळेचे मुख्याध्यापक वाई एन अत्तार सर,लब्दे सर, आचरेकर सर, शाळा समिती सदस्य मंगेश लोके, मानद अधीक्षक व ह्या बॅचचे विद्यार्थी संदीप साटम आणि इतर अनेक वर्गमित्रांनी हजेरी लावली. शाळेच्या जुन्या वर्गखोल्या, मैदानी खेळ, शिक्षकांचे प्रेम आणि शिक्षणातील टप्पे आठवत सर्वजण भावनाविवश झाले होते. हे क्षण नुसते आठवणीत राहिले नाहीत, तर त्यांनी शाळेच्या नव्या उभारणीसाठी ठोस मदत करून आपल्या ऋणानुबंधाला मूर्त स्वरूप दिले.या बॅचच्या एकत्र येण्यासाठी मिलिंद वायगणकर, संदीप साटम, वैशाली चव्हाण, अलकनंदा शिरोडकर, विजय साटम व इतर अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमात बोलताना उपाध्यक्ष संभाजी साटम यांनी भावनिक आवाहन केले की, “शाळेचा पुढचा प्रवास अधिक भक्कम करण्यासाठी तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्यावा. ही केवळ संस्था नसून आपली शैक्षणिक जन्मभूमी आहे.” तर चेअरमन विजयकुमार कदम सरांनी आपल्या वर्गातील काही खास क्षण शेअर करून वातावरण अधिक भावूक केले.

शाळेतील माजी शिक्षक व मान्यवरांचा यथोचित शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या स्नेहमेळाव्याने एका जुना काळ नव्याने जिवंत केला, आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचा दीप उजळला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानद अधीक्षक व बॅचचे विद्यार्थी संदीप साटम यांनी केले.