देवगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिरगाव हायस्कूलची उत्तुंग भरारी

शिवम वाडेकर द्वितीय, तर लोचनी गिरकर तृतीय
Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 11, 2025 11:37 AM
views 86  views

देवगड : शिक्षण विभाग पंचायत समिती, देवगड आणि देवगड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ व्या देवगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिरगाव हायस्कूल, शिरगावच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. माध्यमिक गटामध्ये शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावून शाळेचे व गावाचे नाव उंचावले आहे. नलिनी शांताराम पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयात ९ आणि १० डिसेंबर २०२५ या कालावधीत हे प्रदर्शन संपन्न झाले. 'विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM' हा या वर्षीच्या प्रदर्शनाचा मुख्य विषय होता.

या प्रदर्शनात 'माध्यमिक गटा'तून शिरगाव हायस्कूलचा विद्यार्थी शिवम हरिश्चंद्र वाडेकर याने 'विद्यार्थी प्रतिकृती' (Student Model) विभागात आपल्या कल्पकतेची चुणूक दाखवत द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच, याच शाळेची विद्यार्थिनी कु.लोचनी सखाराम गिरकर हिने 'निबंध' स्पर्धेत उत्कृष्ट लेखन करत तृतीय क्रमांक मिळविला.

दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह (ट्रॉफी) देऊन गौरवण्यात आले. विज्ञान प्रदर्शनातील या दुहेरी यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी शिवम आणि लोचनी, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकवृंद आणि शिरगाव हायस्कूलचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.