सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विजयाचा चौकार मारत सावंतवाडीचा कप उचलला आहे. चौरंगी लढतीत विरोधकांनी घेरलेले असताना त्यांनी हे चक्रव्यूह भेदत मागील तीन टर्मपेक्षा अधिक मत घेत विरोधकांना धूळ चारली आहे. सलग चौथ्यांदा निवडून येत सावंतवाडी मतदारसंघात विक्रमी इतिहास त्यांनी नोंदविला आहे.
दीपक केसरकर यांनी 81 हजार 008 मत घेत विरोधकांना धूळ चारली. 39 हजार 899 एवढ्या मतांचं मताधिक्य श्री. केसरकर यांना मिळालं. सलग चौथ्यांदा विक्रमी मतांनी विजयी होत त्यांनी सावंतवाडी मतदारसंघात पुन्हा नवा इतिहास रचला आहे. पहिल्या फेरीपासून घेतलेल मताधिक्य कायम राखण्यात केसरकर यशस्वी झाले.मागील तिनं टर्मच्या तुलनेत यावेळी त्यांनी अधिक मत घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे दीपक केसरकर यांनी आभार मानले. तर महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सावंतवाडीच्या जनतेमुळे आपला विजय झाला. विजयाच श्रेय दीपक केसरकर यांनी सावंतवाडीची जनता व महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना दिलं आहे.
यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी 41 हजार 109 मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहीले. महाविकास आघाडीच्या बंडखोरीसह अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा मोठा फटका त्यांना बसला. अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी 33 हजार 281 एवढी मत घेतली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बंडखोर अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांना 6174 मत मिळाली. अपक्ष उमेदवार सुनील पेडणेकर यांना 899, दत्ताराम गांवकर यांना 1234 तर 2385 जणांनी नोटाचा पर्याय पसंत केला. 39 हजार 899 च मताधिक्य दीपक केसरकर यांना प्राप्त झाले. यात पोस्टल मतांत दीपक केसरकर यांना 619, राजन तेली 447, अर्चना घारे-परब 230, दत्ताराम गांवकर 21, सुनिल पेडणेकर 8 व नोटाला 88 मत मिळाली. 1600 पैकी 92 मत बाद ठरविण्यात आल्याचे निवडून निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. तर विजयी उमेदवार म्हणून त्यांना घोषित करण्यात आले. लोकसभेला खा.राणेंना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिकच मताधिक्य घेत केसरकर विजयी झाले. केसरकर यांच्या विजयानंतर युवराज लखमराजे भोंसले, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, भाजप जिल्हा संघटक महेश सारंग, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्यासह महायुतीच्या नेत्यांना उचलून घेत जल्लोष करण्यात आला. यानंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये सौ. पल्लवी केसरकर, सोनाली केसरकर-वगळ, सिद्धार्थ वगळ आदींसह केसरकरांचे कुटूंबिय सहभागी झाले होते.