शेखर निकमांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

Edited by: मनोज पवार
Published on: October 28, 2024 13:35 PM
views 265  views

चिपळूण : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे, आमदार शेखर निकम यांचा अर्ज भरण्याच्या निमित्ताने, महायुतीच्या एकसंघतेेचे दर्शन घडले. चिपळूण संगमेश्वर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातून उत्स्फूर्तपणे शेखर सरांच्या समर्थनार्थ चिपळूण शहरात आलेल्या सर्व जाती धर्मातील स्त्री पुरुषांच्या जनसागराने  शेखर निकमांच्या विजयाची गुढी निश्चित झाली.

चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे, महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून,   शेखर गोविंदराव निकम यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे, माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सदानंद चव्हाण, चिपळूण पंंचायत समिती माजी सभापती शौकत मुकादम, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांचे उपस्थितीत,  चिपळूण चे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे, आज सोमवार, (ता.२८ ऑक्टोबर) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.  यावेळी महायुतीकडून शक्तिप्रदर्शन करीत चिपळूण शहरातून प्रांत कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. चिपळूण नगर परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून,  बाजारपेठ,  चिंचनाका, भोगावे, मध्यवर्ती एस.टी.स्टॅन्ड,  विरेश्वर कॉलनी मार्गे , मुंबई गोवा महामार्ग ते प्रात कार्यालय अशी ही रॅली ,सकाळी 11 ते दुपारी 1.30 पर्यंत महारॅली काढून आपला विजय निश्चित असल्याची सूचित केले आहे. यावेळी शेखर सर, लोकांना हात जोडून आणि हात उंचावून अभिवादन करित होते. तर लोक त्यांना पुष्पहार घालून , हस्तांदोलन करून शुभेच्छा 

देत होते. शेखर सरांच्या समर्थनार्थ आलेल्या लोकांमुळे चिपळूण शहरात चिंचनाका शिवाजी चौक कडे येणारे सर्व मार्गावरील ट्रॅफिक जाम झाले होते. संपूर्ण शहर शेखर निकमांच्या आवाजाने आणि घोषणांनी दुमदुमले होते. चिपळूण,  संगमेश्वर तालुक्यातून शहरी आणि ग्रामीण भागातील स्त्री पुरुष जनता स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली होती. भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट,  आर पी आय आठवले गट,  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आदी महायुतीचे  सर्व कार्यकर्ते, तसेच सर्व हिंदु मुस्लिम समाजातील महिला पुरुष सहभागी झाले होते.