
चिपळूण : काल शनिवार, ता. १६ रोजी चिपळूणमध्ये महाआघाडी वतीने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची सभा झाली. यासभेतील आपल्या भाषणात त्यांनी महायुतीबरोबर, महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्यावर ही टीका केली. या टीकेला शेखर निकम यांच्याकडून त्यांचे भाऊ डॉ. अमोल निकम यांनी सोशल मीडियावर खासदार अमोल कोल्हेंच्या नावे पत्राद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
डॉ.अमोल निकम, खासदार कोल्हेंना उद्देशून म्हणतात, की आपल्या बद्दल खूप चांगले ऐकले होते, पण आज आपले भाषण एका प्रगल्भ राजकीय नेत्यासारखे वाटले नाही. संपूर्ण भाषणात गद्दार, अंगार, खोके याच मुद्द्यांवर सतत चर्चा होत होती. आजच्या तरुण पिढीला काहीही प्रेरणा देणारा संदेश नव्हता. त्यांना आयुष्यात काय चांगले करायचे याचा साधा उल्लेखही नव्हता. खोट्या आरोपांवर आधारित संवादबाजीसारखे आपले भाषण होते.
आमचे नेते, माझे बंधू, आ. शेखर गोविंदराव निकम यांनी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून पायाला भिंगरी लावल्यासारखी मेहनत घेतली आहे. गावागावात जाऊन विकासकामे केली आहेत. तुम्ही म्हणता रोजगार पळवला, पण याच शेखर सरांनी हजारो जणांना रोजगार दिला. याबाबत सांगायला घेतले तर एक दिवस पुरणार नाही.
शिक्षणासाठी मुलांना मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते, पण शिक्षणमहर्षी खासदार स्व. गोविंदराव निकम (आमचे काका) यांनी कोकणात शिक्षणाची गंगा आणली. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शाळा आणि महाविद्यालयांमधून महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील विद्यार्थी वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये शिक्षण घेत आहेत.
जेव्हा कोकणात आंबा व काजू यांना योग्य भाव मिळत नव्हता, तेव्हा स्व. गोविंदराव निकम यांनी गावागावात आंबा-काजू नर्सऱ्या सुरू करून दिल्या. हजारो युवक आणि लहान मुले आंब्याच्या कोयी जमा करून विकू लागली. कलम करणे आणि कलम लागवड यामुळे रोजगारनिर्मिती झाली. तेव्हा कोकणात कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन असे उद्योग आणून शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. तसेच कोकणातील सुपीक मातीमध्ये भात, आंबा आणि काजूपलीकडे ऊस शेतीचे प्रयोग करून तरुणांना सहकारी चळवळीत सामील करून घेतले. आज आपल्या भाषणात आपण शेखर सरांना “गद्दार” म्हणून हिणवले. का हो ? आपले आदरणीय पक्षप्रमुख शरद पवार साहेबांनी, स्व. यशवंतराव चव्हाण यांचे सरकार पाडले त्याला किंवा काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला, त्याला काय म्हणाल ?
विकासाचे राजकारण की गद्दारी?
तसेच आपण ज्या उमेदवाराच्या प्रचारार्थ हे भाषण केले, त्यांनी सुद्धा काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष पद सोडून, आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश केलेला आहे. याला निष्ठा म्हणाल की गद्दारी? प्रत्येक नेता जनतेच्या भल्यासाठी परिस्थितीनुसार निर्णय घेतो.
आ. शेखर निकम यांनीही चिपळूण-संगमेश्वर च्या विकासासाठी आणि मतदारसंघातील प्रलंबित कामे, योजना पूर्ण करण्यासाठी अजित पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक रखडलेली विकासकामे मार्गी लागली. त्यात चिपळूण शहराचा पूराचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करून वाशिष्ठीतील गाळ काढणे, चिपळूण शहराची ग्रॅव्हिटी नळपाणी योजना , मुस्लिम समाजाच्या सभागृहाच्या इमारतीची संरक्षक भिंत , सावर्डे गावची नळपाणी योजना, डेरवण (सावर्डे ) धरण प्रकल्प योजना, देवरुख शहरातील नळपाणी योजना अशा, त्यांनी केलेल्या सुमारे २१०० कोटी रक्कमेच्या असंख्य कामांचा अभ्यास करावा, आणि या विकास कामांच्या जोरावर त्यांनी जनतेच्या मनात स्थान मिळवले आहे.
तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली होती. आपण एक उत्तम अभिनेते आहात, मात्र खरोखर संभाजी महाराजांचा आत्मा तुमच्यात असता, तर कोकणच्या सुसंस्कृत परशुराम भूमीत हे द्वेषाचे विष पेरले नसते. एकंदर, आजच्या भाषणाचा प्रभाव एका स्क्रिप्टप्रमाणे वाटला. आपले भाषण तरुणांमध्ये संभ्रम निर्माण करणारे होते. मात्र, चिपळूण-संगमेश्वरमधील मतदार, विशेषतः तरुण, अशा राजकारणाला कंटाळले आहेत. त्यांना विकास हवा आहे. पत्राच्या शेवटी ते म्हणतात, शेखर सरांसारखा संयमी, विकासाचा वसा घेतलेला नेता आजच्या पिढीला हवा आहे. त्यांचे कार्यच ही खरी पोचपावती आहे.