शेखर निकामांच्या जाहीरनाम्यात काय ?

Edited by: मनोज पवार
Published on: November 07, 2024 16:03 PM
views 247  views

चिपळूण :  चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटीहून अधिक विकासाची कामे झाली आहेत. रस्ते- पाखाड्या ही विकासाचे कामे होतच राहतील. परंतु, आता पुढील पाच वर्षात पर्यटन, कृषी, उद्योगधंदे यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचा आपला संकल्प आहे. पर्यटनाच्या माध्यमातून चिपळूण व संगमेश्वर या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती निर्माण करण्याचे ध्येय असल्याचं आमदार शेखर निकम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.


चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून उमेदवार म्हणून रिंगणात असलेल्या आमदार शेखर निकम यांनी चिपळूण-संगमेश्वरचे घोषणापत्र अर्थात आपला कार्यअहवाल सावर्डे येथे बुधवारी जाहीर केला. 


यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की,  चिपळूणला पूरमुक्त करण्याचं आपलं स्वप्न आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू झाले आहे. मतदारसंघात छोटे-मोठे पाझर तलाव उभारण्याची गरज आहे, असे झाल्यास पाण्याचा प्रश्न कायमचा निघून जाईल. १२ पाझर तलाव मंजूर झाले आहेत. आणखी काही करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षणावर आधारित ट्रेनिंग, त्यातून रोजगार निर्मिती करण्यावर आपले लक्ष असेल, अशा शब्दांत आपली पुढील पाच वर्षांची दिशा स्पष्ट केली. 


चिपळूण बरोबरच विशेषत: संगमेश्वर तालुक्यात कृषी पर्यटनावर आधारित खूप मोठे काम करता येईल. मार्लेश्वर टिकलेश्वर, महिपतगड, कसबा, प्रचितगड अशा तीर्थक्षेत्र व किल्ल्यांच्या विकासासाठी निधी प्राप्त झाला आहे. भविष्यात अधिकचा निधी आणून या ठिकाणी पर्यटन कसे वाढेल, याकडे लक्ष दिले जाईल. चिपळूणच्या गोवळकोट किल्ल्याच्या संदर्भातील काही तांत्रिक अडचणी दूर झाल्या, तर या किल्ल्याचे वैभव टिकवता येईल, असे त्यांनी सांगितले.


 आरोग्याचा प्रश्न चिपळूण -संगमेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आरोग्य यंत्रणा भक्कम करायची आहे. चिपळूण, संगमेश्वर ट्रॉमा केअर युनिट सुरू केले जाईल. खेर्डी एमआयडीसीमध्ये काही जागा पडीक आहेत. या ठिकाणी ऍग्रो टुरिझम इंडस्ट्रीज उभारण्याचा प्रयत्न असेल. अलोरे या ठिकाणी शासनाची जागा पडीक असून या ठिकाणी एनडीआरएफ तळ उभा करण्याचे आपले प्रयत्न सुरू होते, परंतु ते अपुरे पडले. परंतु या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचं मानस आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.


खेळाडू अशोकराव शिंदे, धनराज पिल्ले यांच्या माध्यमातून आपण सावर्डे येथे स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करीत आहोत. चिपळूण येथील पवन तलाव मैदान उत्तम पद्धतीने तयार होत आहे. सीझनसाठीच्या तीन विकेट तयार होत आहेत. चंद्रकांत पंडित, समीर दिघे यांनी सहकार्य व मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली आहे. त्याचबरोबर चिपळूणमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारले जाणार आहे. सावर्डे येथे जेईई, नीट या परीक्षा साठीचे मार्गदर्शन अवघ्या दहा हजार रुपये फीमध्ये मिळत आहे. भविष्यात या परीक्षांबरोबरच स्पर्धा परीक्षांबाबत मुलांना मार्गदर्शन मिळावे, असा आपला प्रयत्न असेल. एकंदरीत पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती, कृषी पर्यटन, उद्योगधंदे आणणे यावर आपला भर असेल, असे ते म्हणाले. 


यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय गुजर, हनीफ हरचिरकर, जाकीर शेकासन आदी उपस्थित होते.