क्रीडा संकुलसाठी 'आर पार'ची लढाई ; शीतल राऊळ यांचा इशारा

Edited by: विनायक गावस
Published on: August 11, 2023 11:21 AM
views 103  views

सावंतवाडी : बांदा येथे क्रीडा संकुल व्हावे यासाठी गेली सहा वर्षे आपण झटत आहोत.मात्र काही ना काही कारणे देत हे क्रीडा संकुल सावंतवाडीत नेण्याचा घाट घातला गेला. आम्हाला फक्त आश्वासने देण्यात आली.मात्र आता ही 'आर पार'ची लढाई असून अभी नहीं तो कभी नही अशी भूमिका घेत माजी सभापती शीतल राऊळ यांनी १५ ऑगस्टला सिंधुदुर्गनगरी येथे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला. या क्रीडा संकुला बाबत निर्णय झाल्याशिवाय आपण निर्णय बदलणार नसल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

बांदा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची सुमारे १३ एकर जागा आहे.याठिकाणी क्रीडा संकुल व्हावे अशी मागणी २०१७ पासून शीतल राऊळ यांनी लावून धरली आहे. गेली सहा वर्षे याबाबत केवळ आश्वासने देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगत आता ही आरपारची लढाई असून सर्व खेळाडू आणि बांदा वासियांनी साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.केंद्रात आणि राज्यात सत्तेत असतानाही मी उपोषणाला बसणार असून यात कोणताही बदल होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या क्रीडा संकुलामुळे येथील युवकांना रोजगार मिळेल,क्रीडा पटूंना चांगलं मैदान मिळेल असेही त्यांनी सांगितले. ओरोस येथे १५ ऑगस्टला आमरण उपोषण छेडणार असून क्रीडा संकुल मंजूर करून घेणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य तथा ज्येष्ठ क्रिकेटपटू हुसेन मकानदार,उपसरपंच जावेद खतीब उपस्थित होते.

शीतल राऊळ यांनी पुढे सांगितले या क्रीडा संकुल संदर्भातील सर्व कागदपत्रे आणि फाईल तयार होती.मात्र मागच्या दोन वर्षात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पुढील प्रक्रियेला खो बसल्याचा आरोप त्यांनी केला.त्यामुळे आता याबाबत आपण हा निर्णय घेतला असून आमचं सरकार असून जर क्रीडा संकुल बांद्यात झालं नाही तर आपण राजकारण सोडून देणार असा घरचा आहेरही त्यांनी दिला.

यावेळी हुसेन मकानदार यांनीही राऊळ यांच्या निर्णयाला पाठींबा दिला असून येथील युवकांना सावंतवाडीत केवळ क्रीडा संकुल नसल्यामुळे जावे लागते.ती गैरसोय दूर होणार असल्याने सर्वांनी राऊळ यांना पाठींबा देण्याचे आवाहन केले.स्वतःचं सरकार असताना येथील क्रीडा संकुलाला मंजुरी मिळत नाही ही खेदाची बाब असल्याचा टोलाही त्यांनी लागावला.

तर उपसरपंच जावेद खतीब यांनीही शीतल राऊळ यांच्या भूमिकेचे समर्थन करीत त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला.याठिकाणी क्रीडा संकुल झाले तर त्याचा फायदा ग्रामपंचायतिलाही होईल.गावाच्या विकासासाठी यातून उत्पन्न मिळेल असेही खतीब म्हणाले.