प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सत्काराने शरद पवारांचा वाढदिवस साजरा

जिल्हा राष्ट्रवादीचा अनोखा उपक्रम
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 13, 2023 12:37 PM
views 89  views

कणकवली : प्रशासकीय अधिकारी म्हणून जनतेची विकासकामे करणे, प्रलंबित कामांचा निपटारा करणे, शासनाची ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणे हे कर्तव्य आम्ही इमानेइतबारे पार पाडत असतो. अशा वेळी राजकीय पदाधिकाऱ्यांनी आमच्या कामाची दखल घेत आमच्या अंगावर पांघरलेली कौतुकाची शाल ही सकारात्मक आणखी  वृत्तीने आणखी काम करण्याची प्रेरणा देते अशा भावना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा ते तालुकास्तरीय महत्वाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना कणकवली राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर म्हणाले की, प्रशासन हा लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे.शासनासोबत प्रशासनाची जोड असली की जनताभिमुख विकास हा निश्चित साध्य होतोच. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा.शरद पवार यांनी आपल्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत नेहमीच कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मान राखला. त्याच भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिनी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे. खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी किशोर तावडे ,जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी , कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर,  वैभववाडी तहसीलदार दिप्ती देसाई,  कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव , कणकवली पं स गट विकास अधिकारी अरुण चव्हाण  कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते यांचा शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा.दिवाकर मुरकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, कणकवली विधानसभा मतदारसंघ युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कणकवली युवक तालुकाध्यक्ष नयन गावडे, शहराध्यक्ष सागर वारंग, संदेश मयेकर, सुजल शेलार आदी उपस्थित होते.