
चिपळूण : शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयामधील सुमारे चाळीस विद्यार्थ्यांची गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ येथे होणाऱ्या अश्वमेध 2025 या आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांचे मार्फत निवड करण्यात आली. ता. 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या क्रीडा महोत्सवामध्ये बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कबड्डी, खो-खो ,बुद्धिबळ या क्रिडा प्रकारांचा समावेश आहे.
या सर्व क्रिडा प्रकारांमध्ये महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट अशा खेळाचे प्रदर्शन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संघात सर्वात जास्त सहभाग शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचा आहे.या सर्व विद्यार्थ्यांचे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील सह्याद्रि क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम यांनी अभिनंदन करत दैदीप्यमान यशासाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक सुहास आडनाईक यांचे मार्गदर्शन लाभले.