
सावंतवाडी : शहराच्या चितारआळी भागात असलेल्या 'लेक व्ह्यू अपार्टमेंट' या इमारतीमधील अतिक्रमण केलेल्या बांधकामावरून वाद निर्माण झाला असून शांती सुरेश सावंत यांनी कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, न.प. कडून कारवाईत दिरंगाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्याधिकारी, प्रांताधिकारी यांना पत्र पाठवून भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा दिला आहे.
शांती सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लेक व्ह्यू अपार्टमेंट'च्या दुसऱ्या मजल्यावर एका कार्यालयाबाहेर वाढीव बांधकाम करण्यात आले आहे. तसेच तळमजल्यावरील गाळेधारकांनी पत्र्याच्या शेड व ओटे बांधले आहेत. या बेकायदेशीर बांधकामामुळे रहिवाशांची नेहमीची पायवाट बंद झाली आहे. यामुळे संकुलाला धोका निर्माण झाला असून रहिवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण झाल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात वेळोवेळी सावंतवाडी नगरपरिषदेकडे तक्रार अर्ज केले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत नगरपरिषदेकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच, या बांधकामासंदर्भात कोणतीही माहिती त्यांना देण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, १७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यांनी दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात नगरपरिषद दिरंगाई करत असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. जर या अनधिकृत बांधकामामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास किंवा स्थानिक रहिवाशांमध्ये रोष उत्पन्न होऊन कोणतीही अप्रिय घटना घडल्यास, त्याला मुख्याधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संपूर्ण नगरपरिषद जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत न.प. बांधकाम विभागाला विचारलं असता, २०२३ ला हे वाढीव अतिक्रमण हटावावं असे निर्देश दिले होते. सावंत यांच्या मागणीनुसार पुन्हा एकदा संबंधितांना कळवले जाईल. तसेच हा विषय मुख्याधिकारी यांना सांगून त्यांच्या आदेशान्वये उचित कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती रचना सहाय्यक गौरव बुगड यांनी दिली.










