कोलझर वृक्षतोडप्रकरणी वनविभागाची कारवाई

दोघांविरोधात गुन्हा दाखल ; तातडीने पंचनामा
Edited by:
Published on: January 13, 2026 15:51 PM
views 202  views

ग्रामस्थांच्या भूमिकेचे स्वागत

दोडामार्ग : कोलझर ग्रामस्थांनी एल्गार छेडल्यानंतर येथील खाजगी जंगल क्षेत्रात झालेल्या बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी वनविभागाने ठोस पावले उचलत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी रितसर पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे.

कोलझर येथील डोंगर परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी सुमारे ४ किलोमीटर लांबीचे उत्खनन केल्याची बाब उघडकीस आली आहे. हा परिसर केंद्र सरकारने इको-सेंसिटिव्ह एरिया म्हणून घोषित केलेला असून, स्थानिकांच्या मालकीच्या जमिनीत कोणतीही परवानगी न घेता उत्खनन करण्यात आले होते. या ठिकाणी जंगली वृक्षांची तोड करून ती मुळासकट चोरून नेण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी याविरोधात ठाम भूमिका घेतली. त्यानंतर खडपडे वनक्षेत्रातील वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी तातडीने भेट देत वृक्षतोड व उत्खननाचा पंचनामा केला. या प्रकरणी संबंधित दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वनपाल किशोर जंगले व वनरक्षक सुबोध नाईक यांनी केली.

याबाबत माहिती देताना वनपाल किशोर जंगले म्हणाले, 'इको-सेंसिटिव्ह क्षेत्रात झालेल्या या प्रकाराची माहिती मिळताच आम्ही तातडीने पंचनामा व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. घटनास्थळी मोजमापे घेण्यात आली असून तपास सुरू आहे. तपासाअंती संबंधितांची नावे जाहीर केली जातील. या भागातील पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही सक्षमपणे पार पाडत आहोत. पर्यावरण रक्षणासाठी ग्रामस्थ पुढे येत असल्याचे समाधानकारक असून त्यांना वनविभागाकडून कायम सहकार्य राहील', अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.