
सावंतवाडी : शेवटच्या चेंडू पर्यंत अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या अंतिम सामन्यात थरारक विजय प्राप्त करीत गुरुमाऊली संघाचा पराभव करित शांतादुर्गा मळगांव संघाने 'भंडारी चषका 'वर आपले नाव कोरले. तर तुल्यबळ लढत देणारा गुरुमाऊली संघ उपविजेत्या चषकाचा मानकरी ठरला. अंतिम सामन्यातील मुन्ना सावळची २८ धावांची नाबाद खेळी संघाला विजेता ठरविण्यात महत्वपूर्ण ठरली. तर संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या हनुमंत पेडणेकर यांचे प्रयत्न अपुरे ठरले. विजेत्या संघाला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब पुरस्कृत रोख १५ हजार व माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर प्रायोजित आकर्षक भव्य भंडारी चषक तर उपविजेत्या संघाला दया चौधरी (मनोरमा ट्रस्ट वालावल ) व युवा उद्योजक प्रसाद नाईक पुरस्कृत रोख १० हजार व कै. महादेव हळदणकर स्मृती प्रित्यर्थ पांडुरंग हळदणकर पुरस्कृत आकर्षक भव्य चषक देऊन मान्यवरांच्या सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट व भेदक अशी गोलंदाजी व धडाकेबाज फलंदाजी करणारा शांतादुर्गा संघाचा शंकर उर्फ साईश केरकर स्पर्धेचा मालिकाविर तर गुरु माऊली संघाचा गोलंदाज राजेश्वर उर्फ राजू रेडकर उत्कृष्ट गोलंदाज, केवळ १८ चेंडूत ५४ धावांच्या एका अर्धशतकी खेळीसह षटकार व चौकारांची आतषबाजी करणारा महेंद्र पेडणेकर उत्कृष्ट फलंदाज तर आपल्या चपळाईच्या क्षेत्ररक्षणाने अनेक गडी बाद कारण्यासाठी व धावा रोखण्यासाठी मदतगार झालेला अमेय तळकटकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला. तर एकाच षटकात हॅट्रीक सह ४ गडी बाद करत संपूर्ण स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीची भूरळ पाडण्यासोबतच वयाच्या ५० व्या वर्षी उत्कृष्ट यष्टीरक्षण करणाऱ्या सरपंच हनुमंत पेडणेकर यांना यष्टीरक्षणाचा सन्मान मिळाला. अंतिम सामन्यात शंकर केरकर सह दोन गडी बाद करणारा व स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने प्रेक्षकांना तोंडात बोटं घालायला लावलेला प्रद्युम्न सातार्डेकर व गोलंदाज गणेश जोशी यांना उत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले.
डिजेचा थरार, बक्षिसांची लयलूट व शेकडो प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे मळगांव येथील म्हारकाटा मैदान येथे शनिवार व रविवारी सकल भंडारी बांधव आयोजित 'भंडारी चषक २०२५ ( पर्व १ ) ही स्पर्धा अत्यंत धुमधडक्यात पार पडली. स्पर्धेचं उत्कृष्ट आयोजन देखील सर्वांची वाहवा मिळवून गेलं. १२ ते १६ वर्षांच्या मुलांपासून ते ५५ वर्षांच्या वयोगटातील खेळांडूचा सहभाग हे देखील या स्पर्धेचे अनोखे वैशिष्ट्य ठरले. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा माजी जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, पत्रकार सचिन रेडकर, एल आय सी एजंट पराडकर, युवा उद्योजक प्रसाद नाईक, सामाजिक कार्यकर्ते दीपक जोशी, संजय बागवे, उदय सावळ, आबा सावळ यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
अंतिम सामन्यात गुरुमाऊली संघाने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित चार षटकात ५० धावा करत दिलेले ५१ धावांचे उद्दिष्ट पार करत शांतादुर्गा मळगाव संघाने विजेतेपद पटकावले. मुन्ना सावळची नाबाद २८ धावांची खेळी विजेतेपदाला गवसणी घालण्यात महत्त्वपूर्ण ठरली. तत्पूर्वी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अण्णा इलेव्हन संघाचे ३७ गावांचे लक्ष पार करीत गुरुमाऊली संघाने अंतिम फेरी गाठली. उत्कृष्ट गोलंदाजी व फलंदाजी देखील करणारा राजू रेडकर या सामन्याचा सामनावीर ठरला. तर उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भंडारी फायटर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ४३ धावा करीत ४४ धावांचे दिलेले लक्ष एकाकी खेळीच्या जीवावर पार करीत संघाला विजय मिळवून देत अंतिम सामन्यात धडक देणारा शंकर केरकर या सामन्याचा सामनावीर ठरला. वयाच्या ५२ व्या वर्षी गोलंदाजी व फलंदाजीतही महत्वपूर्ण योगदान देणारा व एका महत्वपूर्ण सामन्यात एका षटकात केवळ १ धाव देत दोन धावबाद व तीन गडी बाद करीत सामनावीर ठरलेला भंडारी फायटर्स संघाचा सचिन रेडकर हा जेष्ठ खेळाडू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. तर जेष्ठ खेळाड हनुमंत पेडणेकर, तेजपाल सावळ, उदय सावळ, टिळक सावळ, संतोष अमरे, नंदकिशोर नाईक, उमेश आजगांवकर, नितीन कोचरेकर, शैलेंद्र पेडणेकर यांनीही पन्नाशीच्या वयात केलेली खेळी गौरवास्पद ठरली.
स्पर्धेसाठी समीर परब यांच्याकडून मालिकावीर चषक, पत्रकार सचिन रेडकर व सामाजिक कार्यकर्ते उद्योजक शेखर गावकर यांच्याकडून प्रत्येक सामन्यातील सामनावीर चषक, कै. प्रवीण सातार्डेकर यांच्या स्मरणार्थ प्रीतम सतार्डेकर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज चषक तर पप्पू कांबळी त्यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व उदयोन्मुख खेळाडूंना आकर्षक चषक प्रायोजित करण्यात आले होते. समस्त भंडारी बांधवांच्या योगदानामुळे ही भव्य दिव्य स्पर्धा अत्यंत स्मरणीय ठरली.