जमीन विक्री हल्ला प्रकरणी शैलेश नाईक दोषी

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 07, 2023 19:57 PM
views 313  views

सिंधुदुर्ग : जमीन विक्री करून हिश्याचे पैसे न दिल्याने रागाच्या भरात काकाच्या डोक्यावर व शरीरावर फावड्याने हल्ला करत मयत प्रभाकर नाईक यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी संशयित आरोपी शैलेश वसंत नाईक याला भादवि कलम 304 (1) नुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारुका यांनी दोषी ठरविले आहे. तर याबाबत शुक्रवार 8 डिसेंबर रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे अशी माहिती सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी दिली.


सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे करमळ गाळू येथे 17 ऑक्टोबर 2021 रोजी संशयित आरोपी शैलेश वसंत नाईक याने काकाने जमीन विक्री करून आपल्याला हिस्याचे पैसे न दिल्याचा राग मनात ठेवून काकावर फावड्याने हल्ला केला होता. यात मयत प्रभाकर नाईक यांना डोक्यावर व शरीरावर गंभीर दुखापत झाली होती. मात्र मयत प्रभाकर नाईक यांचा उपचारादरम्यान सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. यानंतर संशयित आरोपी शैलेश वसंत नाईक याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी दरम्यान आठ साक्षीदार तपासण्यात आले व यानंतर संशयित आरोपी शैलेश वसंत नाईक याला दोषी ठरविण्यात आले. याबाबत शुक्रवारी 8 डिसेंबर रोजी संशयित आरोपी शैलेश वसंत नाईक याला शिक्षा सुनावली जाणार असल्याचे सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी सांगितले.