आठवीतील विद्यार्थ्यांकडून रॅगींगसह लैंगिक शोषण

पालकांची पोलिसांत धाव ; जिल्हाधिकाऱ्यांचही वेधलं लक्ष
Edited by:
Published on: January 13, 2025 20:03 PM
views 398  views

सावंतवाडी : तालुक्यातील एका नामांकित विद्यालयात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकडून सहावीत व सातवीत शिकणाऱ्या मुलांवर रॅगिंगसह लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत संबंधित शोषित विद्यार्थ्याच्या पालकांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. आज पोलिस ठाण्यात संबंधित विद्यालयाच्या मुख्याध्यापक व हाऊस मास्टर यांना बोलावून घेत पोलिसांनी या प्रकरणाची इत्यंभूत माहिती घेतली. तर याबाबत संबंधित पालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत गैरवर्तन करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांसह विद्यालयाचे मुख्याध्यापक, हाऊस मास्टर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील या विद्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांची भरणा आहे. या विद्यालयात अलीकडेच विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारा प्रकार घडला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्या प्रकारानंतर आता पुन्हा एकदा हे विद्यालय रॅगिंग आणि लैंगिक शोषणाच्या प्रकारानंतर चर्चेत आले आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील इयत्तेत असलेल्या विद्यार्थ्यांसह रॅगिंग करणे, लैंगिक शोषणासह त्यांना मारहाण करणे व तक्रार केल्यास धमकी देण्यासारखे प्रकार या विद्यालयात घडल्याचे समजत आहेत. याबाबत शोषित विद्यार्थ्याच्या पालकांनी आज सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांच्या कानावर घालत कारवाईची मागणी केली आहे. हा प्रकार डिसेंबर 2024 मध्ये पहील्या आठवड्यात झाला. आठवीत शिकणाऱ्या या मुलांकडून आपल्या मुलावर शारीरिक व मानसिक छळ केला गेला आहे. शिवाय लैंगिक शोषणाचे प्रकारही घडला आहे. इतरही मुलांसोबतही हे घडत असल्याची शक्यता आहे. याबाबत पालकांकडे तक्रार कराल तर आणखीन छळ करू अशी धमकी त्या विद्यार्थ्यांकडुन दिली गेल्याचे संबंधित पालकांनी सांगितले. त्यामुळे रॅगिंगने पीडित असणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळावा व गैरवर्तन करणाऱ्या मुलांसह हाऊस मास्टर आणि मुख्याध्यापक यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांच्याकडे केली आहे. दरम्यान, कारवाईसाठी पालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार केल्याचेही यावेळी सांगितले. 

याबाबत पोलीस निरीक्षक श्री चव्हाण विचारले असता, संबंधित मुलं ही अल्पवयीन असून येथील विद्यालयात शिक्षण घेत आहेत. आज पालव व विद्यालयाचे मुख्याध्यापक व हाऊस मास्टर यांच्याशी आपली चर्चा झाली. यावेळी पालकांकडून त्यांच्या अपत्यांवर रॅंगीग, लैंगिक छळ होत असल्याचे सांगितले. तर,गैरवर्तन करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात येणार असून विद्यालयाच्या कमिटीकडे याबाबत कळवले असल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिल्याचे ते म्हणाले.