नवनगरमध्ये गटार सफाई - झाडी तोडीचे काम !

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा पुढाकार
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 02, 2024 13:19 PM
views 65  views

सिंधुदुर्गनगरी : भाजपा जिल्हाध्यक्ष तथा सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण सदस्य प्रभाकर सावंत याच्या प्रयत्नाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड याच्या माध्यमातून सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरण मधील गटार सफाई व रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

    सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरण मध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्गनगरी नवनगर रहिवाशी संघाने नुकतीच भाजपा जिल्हाध्यक्ष तथा सिंधुदुर्गनगरी प्राधिकारण समिती सदस्य यांची भेट घेतली. नवनगरमधील अंतर्गत रस्ते, नगरपंचायत करणे, विरंगुळा केंद्रे, गटार बांधणी करणे असे अनेक प्रश्न मांडण्यात आले. याचवेळी सदयस्थितीत प्राधिकरण मधील रस्त्यालगतची गटारे बुजलेली असल्याने रस्त्यावरच पाणी साचून राहते , रस्ता दुतर्फा झाडी वाढल्याने वाहनचालकांना वळणावर दिसत नाही. अपघाताची शक्यता असल्याने ही कामे तातडीने करण्याची मागणी केली.

 प्रभाकर सावंत यांनी प्राधिकरण मधील समस्याची तात्काळ दखल घेत प्राधिकरण मधील गटार सफाई व झाडी तोडण्याचे काम सुरु केले आहे. त्यांनी स्वखर्चाने जेसीबीही उपलब्ध करून दिला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड यांनीही जेसीबी व कामगार पुरवत गटार साफसफाई व झाडी तोडण्याचे सुरु केले आहे. सिंधुदुर्गनगरिचे अन्य प्रश्नही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सोडवू असे आश्वासन प्रभाकर सावंत यांनी दिले आहे. 

दरम्यान प्राधिकरण मधील गटार सफाई व झाडी तोडण्याचे काम तात्काळ हाती घेतल्याबद्दल सिंधुदुर्गनगरी नवनगर रहिवाशी संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष आदेश नाईक यांनी समाधान व्यक्त केले आहे.