कणकवली शहरात भीषण पाणीटंचाई ; 3 दिवस पाणीपुरवठा ठप्प

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 06, 2023 19:24 PM
views 80  views

कणकवली : कणकवली शहर हे राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नावारूपाला आलेले असताना मात्र या शहराच्या वाटेला सध्या तीव्र पाणीटंचाईची झळ सोसण्याची वेळ आली आहे. गेले काही दिवस कणकवली शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा  केला जात असतानाच गेले तीन दिवस कणकवली शहरात काही भागात पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

शिवडाव धरणाचे पाणी गड नदी पात्रात सोडून देखील ते अद्याप कणकवली शहराच्या नळ योजनेच्या विहिरीपर्यंत पोहोचले नसल्याने शहराला सध्या पाणीपुरवठा करणारी नळ योजना पूर्णपणे ठप्प झाली आहे. एरव्ही श्रेयवादासाठी धावपळ करणारे राजकीय लोकप्रतिनिधी मात्र या शहरवासीयांच्या भीषण पाणीटंचाईकडे पूर्णपणे डोळेझाक करत आहेत. कणकवली शहरात श्रेयवादासाठी अनेकदा टोकाची राजकीय लढाई होते. मात्र गेले तीन दिवस कणकवली शहराला पाणीपुरवठा करणारी नळ योजना बंद असून देखील याचे श्रेय घ्यायला कोणी राजकीय पक्ष देखील येईनात व प्रशासन देखील पाणी लवकरच येईल या पलीकडे आश्वासन देण्याचे पलीकडे काहीच करू शकेना. त्यामुळे कणकवली शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

अशा स्थितीत श्रेयवाद घेणारे राजकीय पदाधिकारी गेले कुठे? असा प्रश्न कणकवली शहरवासीयांना पडला आहे. तर प्रशासनातील अधिकारी हे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त असताना कणकवली शहरातील जनता पाण्याविना गेले तीन दिवस प्रतीक्षेत आहे. त्यामुळे याबाबत कणकवली नगरपंचायत चे प्रशासक जगदीश काटकर व मुख्याधिकारी अवधूत तावडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान हरकुळ - कसालकर वाडी पर्यंत शिवडाव धरणाचे पाणी आल्याचे सांगण्यात येते. मात्र नदीपात्र भरून ते कणकवली नदी कणकवली पर्यंत येण्यास अजून दोन दिवस ही दिवस जाऊ शकतात. सद्यस्थितीत पाणी साठेल त्या प्रमाणात पाणी योजनेच्या टाकीमध्ये भरून ते सोडले जाते. परंतु हे पाणी कणकवलीतील एक वाडी देखील पूर्ण पिऊ शकत नाही. अशी स्थिती असताना हा प्रश्न गंभीर बनत असून याबाबत प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात गुंतलेले असल्याने तोपर्यंत जनतेने पाण्यासाठी ताटकळत राहायचे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर एकीकडे हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडण्याचे दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ततेकडे गेले नसून अद्याप करंजेपर्यंत देखील हे पाणी आलेले नाही.

त्यामुळे कणकवली तालुक्यातील भिषण बनत चाललेल्या या पाणीटंचाईकडे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून वेळ काढून प्रशासन लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.