हायवेवर राजापूर तालुक्यात सात पिकअपशेड

Edited by: मनोज पवार
Published on: October 07, 2024 12:39 PM
views 401  views

राजापूर :  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण वेगाने केले जात आहे. मात्र, महामार्गावरील अनेक ठिकाणच्या थांब्यावर पिकअपशेड उभारण्यात आलेल्या नसल्याने प्रवाशांना एसटीसह वाहनांच्या प्रतिक्षेसाठी उन-पावसाच्या झळा सहन करीत रस्त्यावर उभे रहावे लागत आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेवून उन्हाळे गंगातीर्थ येथील ग्रामस्थांनी भाजप पदाधिकार्‍यांसमवेत छेडलेले आंदोलनाची दखल घेत भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शासनाकडे महामार्गावर पिकअपशेड उभाराव्यात अशी मागणी करीत सातत्याने पाठपुरावाही केला. त्याला अखेर यश येताना मुंबई-गोवा महामार्गावर पिकअपशेड मंजूर झाल्या आहेत. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील सात पिकअपशेडचा समावेश आहे.  

पिकअपशेड उभारणीच्या मागणीसाठी उन्हाळे गंगातीर्थ येथील ग्रामस्थांसमवेत छेडण्यात आलेले आंदोलन आणि माजी खासदार श्री. राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांसाठी निवारा वा पिकअपशेड मंजूर झाल्याची माहिती भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर यांनी दिली. मंजूर झालेल्या पिकअपशेड उभारण्याच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरू होणार असल्याचेही श्री. लांजेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. शिवणेवार, श्री. कुमावत यांचेही महत्वाचे सहकार्य लाभल्याचे श्री. लांजेकर यांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांची आता गाड्या पकडण्यासाठी उन्हासह पावसाळ्याच्या झळांपासून सुटका होणार आहे. त्याबद्दल उन्हाळे ग्रामस्थांसह प्रवाशांकडून माजी खासदार श्री. राणे, श्री. लांजेकर यांना विशेष धन्यवाद दिले जात आहेत.  

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेले मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले आहेत. अनेक ठिकाणचे प्रवासी निवाराशेडही तोडण्यात ्आल्या. सध्या काम जोरात सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी अद्यापही निवारा शेड उभारलेल्या नाहीत. तसेच, सावली देणार्‍या झाडांचीही लागवड केलेली नाही. काही ठिकाणी प्रवाशी शेड नव्हत्या. मात्र, भलेमोठे वृक्ष प्रवाशांना सावली देत होते. मात्र, निवाराशेड अभावी चौपदरीकरणामुळे प्रवाशांचा निवाराच हिरावला असून सोबत उन्हाच्या झळा सहन करत एस.टी किंवा वाहनांची प्रतिक्षा करावी लागत आहे. दरम्यान, उन्हाळे गंगातीर्थासह महामार्गावर निवाराशेड उभाराव्यात या मागणीसाठी उन्हाळे गंगातीर्थ येथील ग्रामस्थ सुर्यकांत बाईत आणि ग्रामस्थांसमवेत श्री. लांजेकर यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. भाजपचे जेष्ठ पदाधिकारी अभिजीत गुरव, श्री. लांजेकर यांच्यासमवेत बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना घेरावही घातला होता. त्याची दखल माजी खासदार श्री. राणे यांनी घेत निवाराशेड उभारण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश येताना राजापूरमध्ये उन्हाळे-गंगातीर्थ, उन्हाळे-आग्रेवाडी, शासकीय विश्रामगृह राजापूर, हातिवले, मारूती मंदीर (हातिवले), कोंड्ये, पन्हळे, टाकेवाडी, काझीवाडी, कोंडीवळे, खरवते अशा सात पिकअपशेड मंजूर झाल्या असून त्याच्या बांधकामाची निविदा प्रक्रीयाही पूर्ण झाली आहे. तशी माहिती श्री. लांजेकर यांनी दिली. मंजूर झालेल्या पिकअपशेड उभारण्याच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरूवात होणार असल्याचेही श्री. लांजेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे प्रवाशांची आता गाड्या पकडण्यासाठी उन्हासह पावसाळ्याच्या झळांपासून सुटका होणार असल्याने उन्हाळे ग्रामस्थांसह प्रवाशांकडून माजी खासदार श्री. राणे, श्री. लांजेकर यांना विशेष धन्यवाद दिले जात आहेत.