
सिंधुदुर्गनगरी : गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून साडेबारा वर्षांचा कार्यकाळ आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून साडेबारा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवायात्रेला यंदा अनोखा योगायोग लाभला आहे.
१७ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस, तर २ ऑक्टोबर हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जयंतीदिन. सेवा आणि समर्पणाची हीच भावना पुढे नेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदाचा ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात साजरा होणार आहे.
‘आशीर्वादाचा दिवा’ उजळवून या अभियानाचा प्रारंभ होणार असून, विविध १३ उपक्रमांच्या माध्यमातून देशाचे नेतृत्व जागतिक पटलावर प्रभावीपणे अधोरेखित करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना जिल्ह्याच्या जनतेकडून शुभेच्छांचा अनोखा दीपोत्सव साकारला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबरच्या जन्मदिवसापासून १७ ऑक्टोबरपर्यंत ‘सेवा, सहभाग आणि संकल्प’ या त्रिसूत्रीवर आधारित हे अभियान राबविण्यात येणार आहे.
भाजप नेते खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात मंडल स्तरापासून विविध सेवाभावी, जनजागृती आणि समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत.
नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासोबतच समाजातील युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना सेवा कार्याशी जोडण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
‘आशीर्वादाचा दिवा’ने अभियानाचा श्रीगणेशा
अभियानाच्या संयोजिका श्वेता कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली १७ सप्टेंबर रोजी तिन्ही विधानसभा मतदारसंघांत ‘आशीर्वादाचा दिवा’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.
भाजपच्या माध्यमातून झालेल्या प्रभावी विकासकामांच्या प्रत्यक्ष ठिकाणी लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून दीपप्रज्वलन करण्यात येईल. तसेच घराघरांत दिवे उजळवून नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.
विकासकामांच्या लाभार्थ्यांचा सहभाग आणि घराघरातील दीपप्रज्वलनातून हा उपक्रम कृतज्ञतेचा आणि जनआशीर्वादाचा संदेश देणार आहे.
विद्यार्थ्यांपासून लाभार्थ्यांपर्यंत सेवा कार्याचा जागर
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नेतृत्वाखाली ‘चित्रकला व भाषण स्पर्धा’ आयोजित करण्यात येणार आहेत. शाळांमध्ये विकसित भारत आणि सेवा कार्यावर आधारित विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या विकासाची संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या संयोजनातून ‘नमो सेवा गाथा’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. पथनाट्य आणि जनजागृतीच्या माध्यमातून सरकारच्या सेवा कार्याची आणि विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जाईल.
महिला व बालकांच्या सहभागातून ‘आंगण का उत्सव’ साजरा केला जाणार आहे. संयोजिका व सभापती अनुराधा नारकर यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचारी, माता आणि बालकांचा सहभाग घेऊन पोषण व आरोग्यविषयक जनजागृती करण्यात येणार आहे.
सोशल मीडिया जिल्हा संयोजक श्रीकृष्ण परब यांच्या माध्यमातून ‘कहानी बदलाव की’ हा उपक्रम राबविण्यात येईल. विविध शासकीय योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांच्या लाभार्थी कथा रील स्पर्धेच्या माध्यमातून मांडल्या जाणार आहेत. यासाठी थेट लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन योजनांची माहिती आणि त्यांचा परिणाम समाजापुढे आणला जाणार आहे.
युवा शक्तीपासून जलसंवर्धनापर्यंत
युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेत्री यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत संकल्प यात्रा व सेवा ज्योती यात्रा’ आयोजित केली जाणार असून, जनसहभागातून विकास व सेवा कार्याचा प्रचार रॅलीच्या माध्यमातून केला जाणार आहे.
जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांच्या संयोजनातून ‘जल, जन आणि सेवा संकल्प यात्रा’ राबविण्यात येणार आहे. जलसंवर्धन आणि विकासकामांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
शिक्षण सभापती रितेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली ‘सेवा मेरा योगदान’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाने २५ सेवा उपक्रमांपैकी किमान एका उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे सेवा कार्याला केवळ संघटनात्मक नव्हे, तर व्यापक लोकसहभागाची जोड मिळणार आहे.
‘सरकार आपल्या दारी’च्या माध्यमातून योजनांचा लाभ
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या संयोजनातून ‘सेवा सेतू’ उपक्रम राबविला जाणार आहे. ‘सरकार आपल्या दारी’ या संकल्पनेतून पात्र लाभार्थ्यांसाठी कॅम्प आयोजित करून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाच्या योजना आणि पात्र लाभार्थी यांच्यातील दुवा मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
रक्तदानापासून सायबर सुरक्षेपर्यंत विविध उपक्रम
अभियानाच्या कालावधीत रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी, जलसंवर्धन, शिक्षण सहाय्य, करिअर मार्गदर्शन, नशामुक्ती, महिला आरोग्य, सायबर सुरक्षा, दिव्यांग सहाय्य, मतदार जागृती आणि शासकीय योजनांची माहिती अशा विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमांमध्ये युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग राहणार आहे. त्यामुळे ‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ राजकीय कार्यक्रम न राहता विविध सामाजिक घटकांना जोडणारे व्यापक जनसहभागाचे अभियान ठरावे, यासाठी जिल्ह्यात नियोजन करण्यात आले आहे.
वडनगर ते वाराणसी; सिंधुदुर्गही सहभागी
१७ ऑक्टोबर रोजी या अभियानाचा समारोप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्मभूमी असलेल्या गुजरातमधील वडनगरपासून त्यांच्या कर्मभूमी असलेल्या वाराणसीपर्यंत ‘जलकुंभ पदयात्रा’ काढण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्हाही सहभागी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.
जन्मभूमी वडनगर ते कर्मभूमी वाराणसी या प्रवासात सिंधुदुर्गचा सहभाग हा जिल्ह्यासाठी विशेष अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
देशाच्या नेतृत्वाला शुभेच्छा देताना सेवाभाव, जनसहभाग आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या अभियानात सिंधुदुर्गने १३ उपक्रमांची आखणी करून आपली स्वतंत्र छाप उमटविण्याची तयारी केली आहे.
‘सेवा, सहभाग, संकल्प’मधून विकसित भारताचा संकल्प
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत २०४७चे स्वप्न साकार करण्याच्या संकल्पाला जनसहभागाची जोड देणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
१७ सप्टेंबरपासून सुरू होणारे हे अभियान १७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्याच्या तिन्ही विधानसभा मतदारसंघांत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
२५ वर्षांच्या सेवायात्रेचा उत्सव, घराघरांत उजळणारा ‘आशीर्वादाचा दिवा’, सेवाकार्यात सहभागी होणारी जनता आणि वडनगर ते वाराणसी जलकुंभ पदयात्रेत सिंधुदुर्गचा सहभाग—या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी जिल्हा आपली कृतज्ञता आणि शुभेच्छा व्यक्त करणार आहे.
‘सेवा, सहभाग आणि संकल्प’ या त्रिसूत्रीने सिंधुदुर्गचा हा सेवाउत्सव देशाच्या विकासाच्या संकल्पाशी जोडला जाणार आहे.











