
देवगड : पंचायत समिती देवगड अंतर्गत ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले कनिष्ठ सहाय्यक उमेश ठाकुर यांच्या यशस्वी सेवापूर्ती निमित्त पंचायत समिती देवगड येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम गटविकास अधिकारी देवगड अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपुलकीच्या वातावरणात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ग्रामपंचायत विभाग कामकाजात उल्लेखनीय योगदानाबद्दल गटविकास अधिकारी देवगड अरुण चव्हाण यांनी उमेश ठाकुर यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन गौरवले .
कनिष्ठ सहाय्यक उमेश ठाकुर यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळात ग्रामपंचायत विभागातील प्रशासकीय कामकाजात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा व कार्यतत्परतेने योगदान दिले. ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजासोबतच विविध विकासकामांच्या अंमलबजावणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या सहकार्यपूर्ण स्वभावामुळे अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींमध्ये त्यांनी विश्वासाचे नाते निर्माण केले.
यावेळी या कार्यक्रमास व्यासपिठावर किंजवडे गावचे सरपंच संतोष किंजवडेकर , सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक पाटील , गटशिक्षण अधिकारी मुकुंद शिनगारे ,कृषी अधिकारी दिगंबर खराडे ,कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , उपअभियंता बांधकाम अनिल तांबे , सहाय्यक लेखाधिकारी विवेक चिंदरकर , अधिक्षक कुणाल मांजरेकर , विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) दिपक तेंडुलकर , विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) तुषार हळदणकर , हर्षा ठाकुर आदी मान्यवर तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी, पत्रकार बंधु , लोकप्रतिनिधी , ग्रामपंचायत अधिकारी तसेच ग्रामपंचायत विभागातील सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण यांच्या हस्ते उमेश ठाकुर यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मान्यवरांनी उमेश ठाकुर यांच्या सेवाकाळातील कार्याचा आढावा घेत त्यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक केले. त्यांनी पंचायत समितीच्या कामकाजात दिलेले योगदान उल्लेखनीय असून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी व भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
सत्काराला उत्तर देताना कनिष्ठ सहाय्यक उमेश ठाकुर यांनी आपल्या सेवाकाळात सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उमेश ठाकुर यांनी १ फेब्रुवारी १९९४ ग्रामपंचायत देवगड येथे नोकरीला सुरुवात केली. त्यानंतर दि. २०/०५/२००८ पासून जिल्हा परिषद सेवेत त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग देवगड, तसेच पंचायत समिती मालवण तसेच पंचायत समिती देवगड येथे यशस्वी कामकाज केले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , सुत्रसंचलन सिमा बोडेकर तर आभार लेखाधिकारी विवेक चिंदरकर यांनी मानले .










