
सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीचा विद्यार्थी आणि ५८ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय कॅडेट कोर (NCC) विभागाचा अभिमान असलेल्या इयत्ता नववीतील विद्यार्थी सार्जंट अनंत अनन्या अभिजीत चिंचकर याने राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आपल्या शाळेचे, शहराचे, जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. दिल्ली येथे लेफ्टनंट जनरल गुरप्रीत सिंग यांच्या हस्ते सुवर्णपदकाचा वितरण सोहळा पार पडला.
या अतुलनीय यशाबद्दल त्याचा गौरव करण्यासाठी कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय प्रशासनाकडून भव्य स्वागत आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
ही मिरवणूक गवळी तिठा येथून सुरू होऊन आ. दीपकभाई केसरकर कार्यालय, श्रीराम वाचन मंदिर, गांधी चौक, जयप्रकाश चौक आणि बाजारपेठ या मार्गाने ओपन जीपमधून प्रशालेपर्यंत पोहोचेल. त्यानंतर मिरवणूक कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात पोहोचेल, जिथे सार्जंट अनंत चिंचकर यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या समारंभाला उपस्थित राहून अनंत चिंचकर यांचा गौरव वाढवावा, असे आवाहन सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी परिवाराने केले आहे.