वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल धनावडे - संध्या गावडे यांची DYSP म्हणून बढती

Edited by: ब्युरो
Published on: May 23, 2023 14:27 PM
views 177  views

सिंधुदुर्ग : राष्ट्रपतीपदक विजेते वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल धनावडे व सिंधुदुर्गात होम डि.वाय.एस.पी. या पदभार सांभाळणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्रीमती संध्या गावडे या दोघाही अधिकाऱ्यांना डि.वाय.एस.पी. म्हणून बढती मिळाली आहे. पैकी बढती झालेल्या धनावडे यांची पुणे येथे बदली झाली असून आता ते तिथे राज्य गुप्तवार्ता विभागाचे अप्पर उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. तर निरिक्षक संध्या गावडे यांची रत्नागिरी येथे बदली झाली असून तिथे त्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या डि.वाय.एस.पी. म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.


पोलिस निरिक्षक सुनिल धनावडे यांनी तब्बल ६ वर्षे सिंधुदुर्गमध्ये सेवा बजावली आहे. पहिली तीन वर्षे त्यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्याची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर सव्वा दोन वर्षे त्यांनी जिल्हा क्राईम ब्रॉच प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. तर त्यानंतर ते पोलिस कंट्रोल रुम व ट्रैफिक विभागाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांची आजपर्यंत ३३ वर्षे सेवा झाली असून, मागील ६ वर्षा मध्ये सिंधुदुर्गात सेवा बजावत असतांना त्यांना १ राष्ट्रपती पदक, उत्कृष्ट तपास कामाचे केंद्रीय गृहमंत्रीपदक व ३३ वर्ष उत्तम सेवा बजावल्याबद्दल डि.जी.पी. पदक प्राप्त झाले आहे. त्यांच्या सेवा कार्यकाळात गडहिंग्लज येथील शिक्षकाचा खून तसेच आंबोली घाटात ट्रक क्लिनरचा खून करून साखरेची पोती तुटल्याचे प्रकरण अशा दोन महत्वाच्या प्रकरणाचा तपास त्यांनी यशस्वीपणे केला होता. सिंधुदुर्गतील त्यांची कारकीर्द अतिशय उल्लेखनीय अशीच झाली होती.


जिल्ह्याच्या होम डि.वाय.एस.पी. पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या वरिष्ठ निरिक्षक श्रीमती संध्या गावडे यांनीही जिल्ह्यात ६ वर्षे सेवा बजावली आहे. मधल्या दोन वर्षाच्या काळात त्यांनी गोवा सीबीआय मध्येही महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळली होती. त्या पोलिस निरिक्षक असल्या तरी सिंधुदुर्गात बहुतांशी त्यांनी होम डीवायएसपी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तद्पूर्वी त्यांनी २५ वर्षे मुंबई मध्ये क्राईम बाँच, अॅन्टीकरप्शन ब्युरो व काही पोलीस स्टेशनचा पदभार सांभाळला होता. त्या मुळच्या सिंधुदुर्गच्या सुपुत्री असून आता त्या डि.वाय.एस.पी. म्हणून रत्नागिरी येथील आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाची जबाबदारी सांभाळणार आहेत.