पालकमंत्र्यांचा वचक नसल्याने वरिष्ठ अधिकारी घेतात लाच

वैभव नाईकांचा आरोप
Edited by:
Published on: May 21, 2025 15:02 PM
views 136  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेऊन वेगवेगळे आदेश पालकमंत्री नितेश राणे सोडत आहेत. मात्र कोणत्याच अधिकाऱ्यांना त्यांचा भय  राहिलेला नाही हे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील हयगय प्रकरणानंतर पुन्हा एकदा लाच प्रकरणात दिसून आले आहे. कुडाळ महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता विजय नरसिंग जाधव यांना ५ हजार रुपयांची लाच घेताना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. पालकमंत्री  आणि सत्तारूढ आमदारांचे प्रशासनावर वचक नसल्यामुळेच वरिष्ठ अधिकारी राजरोस लाच स्वीकारत आहेत अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर दोन दिवसात हि लाचखोरी झालेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत लाच घेऊन केली जाणारी  हप्ते वसुली नेमकी कोणासाठी केली जात आहे असा सवालही वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे. 

वैभव नाईक म्हणाले, महावितरण हा नागरिकांच्या दृष्ठीने महत्वाचा विभाग आहे.महावितरणकडे नागरिकांची अनेक वीज संबंधित कामे असून महावितरणच्या बाबतीत नागरिकांच्या अनेक  तक्रारी देखील येत आहेत. पालकमंत्री नितेश राणे, कुडाळचे आमदार निलेश राणे आणि जिल्हाधिकारी यांनी नुकत्याच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या त्यात  महावितरणचे हे अधिकारी देखील उपस्थित होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज संबंधित लोकांचे प्रश्न सोडविणाच्या सूचना देण्यात आल्या मात्र याला दोन  दिवस उलटताच सोलार पॅनलच्या चेकलिस्टवर सही करण्यासाठी महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता विजय नरसिंग जाधव यांनी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली आणि लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

खरंतर शेतकरी आणि  नागरिकांना सोलार वीज निर्मितीकडे वळण्याचे आवाहन सरकार कडून केले जात आहे. मात्र सोलार बसविण्यासाठी वरिष्ठ अधिकारी लाच मागत असतील तर सरकारचा उद्देश कसा सफल होणार? महावितरणचे अधिकारी  हे नागरिकांकडून आणि ठेकेदारांकडून लाच घेत असल्यानेच कामे दर्जेदार केली जात नाही. त्यामुळे कालच्या वळवाच्या पावसात  महावितरणचा बोजवारा उडाला. त्यामुळे मालवण तालुका २५ तास काळोखात आहे. लाचखोरीचा फटका थेट नागरिकांना बसत आहे. त्यामुळे महावितरणच्या लाच प्रकणाची सखोल चौकशी करून त्याला आळा घालणे गरजेचे आहे. असे वैभव नाईक म्हणाले आहेत.