
मालवण : मालवण तालुक्यातील आडवली पशुवैद्यकीय दवाखाना ते समर्थ गड स्वामी समर्थ मठ- त्रिंबक घाडीवाडी सापळे मार्ग या रस्त्याला डांबरीकरणाची प्रतीक्षा आहे. खडीकरण पूर्ण झालेल्या या रस्त्यावर लवकरात लवकर डांबरीकरण पूर्ण करावे अशी मागणी हजारो स्वामी भक्त तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान गतवर्षी आमदार निलेश राणे यांनी मठात भेट देऊन स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद घेतले होते. त्यावेळी सदर रस्ता लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासित केले होते. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा रस्ता पूर्णत्वास जावा अशी मागणी आडवली मठाचे सर्वेसर्वा सुनिल घाडीगावकर उर्फ भाई महाराज यांनी केली आहे.
सदर मार्गावर आडवली समर्थगड स्वामी समर्थ मठ असून नियमित शेकडो स्वामी भक्त मठामध्ये येत असतात. प्रत्येक गुरुवारी रात्री महाआरती साठी सुमारे दोन हजार पेक्षा जास्त भक्त हजर असतात. हीच संख्या मे महिन्यात पाच हजारच्या आसपास असते. जिल्हा तसेच जिल्हा बाहेरून येणाऱ्या अनेक स्वामी भक्त, भाविक पर्यटक याना मातीच्या रस्त्यातून येताना धुळीचा सामना करावा लागतो. तसेच ग्रामस्थांची वस्ती सुध्दा या ठिकाणी असून नव्याने अनेक घरे बांधली जात आहेत. दरम्यान ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद स्तरावर माजी जी प सदस्य महेंद्र चव्हाण, माजी प स सदस्य राजू परुळेकर तसेच इतर लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा शासनाकडे या रस्त्या साठी पाठपुरावा करण्याचे काम केले आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून या रस्त्याचे अंदाजपत्रक सुद्धा बनविण्यात आले आहे. हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असून आडवली ते त्रिंबक हे अंतर कमी करणारा आहे. शासनाने याबाबत त्वरित निर्णय घेत सदर मार्गाचे डांबरीकरण तातडीने पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ, स्वामी भक्त यांच्या मधून होत आहे.










