
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ओरोस येथे आज गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या अभूतपूर्व रांगा पाहायला मिळाल्या. येथील 'वसंत गॅस एजन्सी'च्या बाहेर सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी परिसरत झाली होते. आज सकाळी ९ वाजल्यापासूनच ओरोस वसंत गॅस एजन्सीच्या बाहेर घरगुती सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांनी रांगा लावायला सुरुवात केली. पाहता पाहता ही रांग एवढी लांब गेली की, रस्त्यावर लोकांची आणि वाहनांची मोठी गर्दी झाली. ओरोस मध्ये गॅस सिलेंडरसाठी अशा प्रकारे पहिल्यांदाच लांबच लांब रांगा लागल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
गॅसचा पुरवठा विस्कळीत होणार असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. "खरोखरच गॅसची टंचाई आहे की केवळ भीतीपोटी ही गर्दी होत आहे?" असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अनेक नागरिक 'गॅस मिळणार नाही' या भीतीने वेळेआधीच सिलेंडर मिळवण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसून आले.
जर गॅस सिलेंडरचा पुरवठा लवकरात लवकर नियमित झाला नाही, तर ही परिस्थिती अधिक गंभीर वळण घेऊ शकते. प्रशासनाने लवकरच पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे. सध्या तरी या रांगांमुळे ओरोसमध्ये 'गॅस टंचाई'च्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे.










