राष्ट्रीय कबड्डी खेळाडू वसंत ढवण यांचं निधन...!

८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | नागवे गावचे सुपुत्र
Edited by:
Published on: March 21, 2024 07:34 AM
views 404  views

कणकवली : महाराष्ट्राचे ज्येष्ठ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू नागवे गावचे सुपुत्र वसंत ढवण यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८८ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. तीन दिवसांपूर्वी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र १९ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. वसंत ढवण हे मूळचे मूळ नागवे(ढवणवाडी) ता. कणकवलीचे रहिवाशी होत. त्याच्या जाण्याने नागवे गावावर शोककळा पसरली आहे. नागवे गावात त्यांनी अनेक कब्बडी खेळाडू घडविले आहेत. परिस्थितीमुळे ते वयाच्या १४ व्या वर्षी मुंबईला आले. मामा शिवराम पिळणकर यांच्याकडे आश्रयाला ते राहिले. लोअर परेल येथील श्रीराम कबड्डी संघाकडून त्यांनी कबड्डी खेळाला सुरुवात केली.


फिनिक्स मिलकडून १० वर्ष ते कबड्डी खेळले. त्यानंतर काही काळ लक्ष्मीरतन या संघाकडून व त्यानंतर त्यांना महिंद्र संघाकडून खेळाडू म्हणून नोकरी देण्यात आली. अमृतसर येथे १९६१ साली झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ते प्रथम महाराष्ट्राकडून खेळले. त्यानंतर  जबलपूर (१९६२), अलाहाबाद (१९६३), कोल्हापूर – महाराष्ट्र (१९६४), हैद्राबाद (१९६५), बडोदे (१९६६) अशा सलग ६ स्पर्धेत ते महाराष्ट्राकडून खेळले. पण त्यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी १९७० साली लाभले. डावा कोपरा रक्षक असलेले ढवण चवढा व बॅक काढण्यात माहिर होते. ते अष्टपैलू खेळाडू होते.  उजवी चढाई करणारे ढवण हाताने चांगल्या प्रकारे गडी टिपत असत. त्यांच्या पश्चात पत्नी सावित्रीबाई, तीन मुलगे, मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार आहे.