५ सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त परिसंवाद

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे भोसले नॉलेज सिटीत आयोजन
Edited by: ब्युरो
Published on: September 02, 2023 11:04 AM
views 141  views

सावंतावडी : शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचे दुसरे पालक, या शिक्षकांप्रति आदर-प्रेम दर्शवण्यासाठी शाळा-महविद्यालयांतून दरवर्षी ०५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. भावी पिढीला घडवण्याची, तिला लोकशाही-साक्षर करण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते, हे लक्षात घेऊन यंदा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे ‘लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले आहे.या परिसंवादामध्ये भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब, अभिनेत्री संपदा जोगळेकर, प्राचार्य शमशुद्दीन नसीरुद्दीन आत्तार, सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, छायाचित्रकार इंद्रजीत खांबे, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार परिसंवादाचे संवादक आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या परिसंवादात जुईली पांगम, मोहम्मद शेख, प्रसाद गावडे, पंकज दळवी हे युवा प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहेत.

शिक्षक दिनाच्या या परिसंवादात केवळ औपचारिक शिक्षणावर चर्चा न करता लोकशाही मूल्ये रुजवणारे सर्वांगीण शिक्षण आणि ते शिक्षण देणारे विविध क्षेत्रांतील शिक्षक यांवर ऊहापोह केला जाणार आहे. लोकशाही जीवनप्रणाली  म्हणजे काय? सर्व प्रकारच्या शिक्षणव्यवस्थेत आणि दैनंदिन जीवनात लोकशाही मूल्यांचे पालन का आवश्यक आहे? त्यासाठी काय केले पाहिजे? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता इ. सांविधानिक मूल्ये  आणि कुटुंब, शिक्षण इ. व्यवस्थांचा परस्परसंबंध या मुद्द्यांची सदर परिसंवादात चर्चा केली जाणार आहे.

महाविद्यालयातील १८ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी स्टॉल उभारला जाणार आहे. तसेच मतदान, निवडणूक ही प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजावून सांगणारे सापशिडी व लुडो हे खेळही आयोजित केले जाणार आहेत. या परिसंवादाचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे भारतीय निवडणुकांचा प्रवास आणि युवांना लोकप्रिय असलेल्या मीम्स यांचे प्रदर्शन. भारतीय निवडणुकांचा प्रवास दाखवताना १९५१-५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ते ईव्हीएमपर्यंतचा विविध टप्प्यांवरील प्रवास चित्र रूपाने उलगडण्यात येणार आहे. मतदार जागृतीसंबंधी विविध प्रकारची मीम्सही मालवणी बोलीच्या ठसक्यात प्रदर्शित केली जाणार आहेत. परिसंवादाचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या Chief Electoral Officer, Maharashtra या संकेतस्थळावरून आणि फेसबुक, एक्स (ट्विटर), यूट्युब, इन्स्टा या समाजमाध्यमांवरूनही थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सावंतवाडी परिसरातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी परिसंवादाला उपस्थित राहून प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.