सिंधुदुर्गात आरसेटीद्वारे ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: July 31, 2025 20:27 PM
views 152  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण तरुणांना सक्षम करून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने आरसेटी (रूरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) संस्था कुडाळ येथे कार्यरत आहे. २०१३ पासून मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट आणि बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही संस्था चालवली जाते. वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि स्थानिक तरुणांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत करण्यासाठी ही संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

या संस्थेमध्ये स्वयंरोजगारासाठी आवश्यक असलेले ६४ हून अधिक कोर्सेस विनामूल्य शिकवले जातात. प्रशिक्षणार्थींसाठी जेवण आणि बाहेरून येणाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था देखील केली जाते. टेलरिंग, ब्युटी पार्लर, टू-व्हीलर रिपेअरिंग, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, हाउस वायरिंग, आर्टिफिशियल ज्वेलरी बनवणे, फास्ट फूड स्टॉल ट्रेनिंग, आणि मोबाईल रिपेअरिंग यांसारखे अनेक कोर्स येथे उपलब्ध आहेत.

आतापर्यंत या संस्थेने ६,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे. प्रशिक्षणादरम्यान कोणतेही शुल्क आकारले जात नाही. विशेष म्हणजे, केवळ प्रशिक्षण देऊनच संस्था थांबत नाही, तर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा दोन वर्षांपर्यंत पाठपुरावा करते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत.

बँक ऑफ इंडियामार्फत प्रशिक्षणार्थींना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जसुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते. बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी सर्वांनी या संस्थेशी जोडावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी आरसेटी संचालक किशोर रोडी Bank of India Kudal शाखा व्यवस्थापक. अनंत राव आरसेटी प्रशिक्षक संदेश कसले उपस्थितीत होते.