इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलसाठी पांडुरंग काकतकर यांची निवड..!

Edited by:
Published on: January 28, 2024 09:56 AM
views 76  views

फरीदाबाद : विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार, जैव तंत्रज्ञान विभाग, अवकाश संशोधन संस्था, पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने फरीदाबाद हरियाना येथील रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी (RCB) येथे आयोजित इंडीया इंटर नॅशनल सायन्स फेस्टिवल दि.17 ते 20 जानेवारी या कालावधीत संपन्न झाला.यामधील नॅशनल सायन्स टीचर्स वर्कशॉप यामध्ये विज्ञानाप्रती समर्पित अशा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी व शिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हाने, शिक्षण पद्धती, नाविन्यपूर्ण उपक्रम व तंत्रज्ञानाचा वापर यावर चर्चा करण्यासाठी देशभरातून 300 उपक्रमशील शिक्षकांची निवड करण्यात आली त्यामध्ये महाराष्ट्रातून 22 शिक्षक यात कोकणातून एकमेव सोनुर्ली हायस्कूलचे  शिक्षक पांडुरंग काकतकर यांची निवड झाली होती. 

काकतकर हे गेली 26 वर्षे ग्रामीण भागात विज्ञानाचा प्रचार - प्रसाराचे  अतुलनीय कार्य करत असून  नाविन्यपूर्ण तंत्रस्नेही अध्यापन पद्धतीत त्यांचा हातखंडा आहे.त्यांनी विद्यार्थ्यांसाठी ई- लर्निग,विज्ञान जत्रा,विज्ञान प्रदर्शन,वैज्ञानिक सहल, क्षेत्रभेट, प्रयोगातून विज्ञान, अपूर्व विज्ञान मेळावा या सारखे अनेक उपक्रम राबविले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे ते अध्यक्ष असून राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरचे जिल्हा समन्वयक आहेत.विज्ञान विषयात राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक म्हणून अनेकवेळा त्यांनी काम केले आहे असून आजतागायत राष्ट्रीय व राज्य स्तरावरील अनेक नामवंत शैक्षणिक व विज्ञान संस्थामध्ये त्यांची निवड झालेली आहे त्यात  राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर, आयसर, विद्यापरिषद, यशदा, पुणे,

नेहरु विज्ञान केंद्र मुंबई, आर.आय.ई.भोपाळ, आयसर ,तिरुवनंतपुरम, अगस्त्या सायन्स सेंटर कुप्पम, सी.सी.आर.टी. हैद्राबाद, दिल्ली सायन्स टीचर काँग्रेस, कोलकाता यांचा समावेश आहे.

शिक्षण विभाग, विज्ञान मंडळ व सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या सहकार्यातून राज्यस्तरीय विज्ञान मेळावा, राज्यस्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव या सारख्या कार्यक्रमांच्या दर्जेदार आयोजनात पुढाकार घेऊन सिंधुदुर्गचा नावलौकीक संपूर्ण राज्यभर करण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. शिक्षण विभागामार्फत आयोजित सातारा येथील शिक्षण परिषदेत त्यांनी सिंधुदुर्गतर्फे नेतृत्व करून आपल्या विज्ञान विषयक उपक्रमांचे, तसेच विविध अध्यापन पद्धतींचे सादरीकरण केले होते त्याचे कौतुक राज्याचे तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार यांच्यासह संपूर्ण राज्यभरातील शिक्षणतज्ज्ञांनी केले होते व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या जिल्ह्याचा मान वाढविला होता.

त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव अनेक संस्थांनी आजतागायत केला असून त्यांना अनेक पुरस्कारांनी प्रोत्साहित केले आहे.महाराष्ट्र शासनाकडून 2017 चा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.

जागतिक पातळीवर देशाचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया मजबूत करणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान  मंत्री डॉ. रविचंद्र  हस्ते झाले याप्रसंगी हरियाना मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्यासह इतर मंत्री महोदय उपस्थित होते.सदर महोत्सवात  23 देशांचे शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन तसेच विविध राज्याचे संशोधक, उपक्रमशील शिक्षक,विद्यार्थी यांच्या सोबत हितगुज साधण्याची त्यांना संधी मिळाली.सदर कॉन्फरन्ससाठी कोकण विभागातून एकमेव निवड झाल्याबद्दल राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरच्या संचालिका डॉ. राधा अतकरी, कोल्हापूर विभागीय उपसंचालक महेश चोथे, जिल्हा शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, मुख्याध्यापक गोविंद मोर्ये यांनीं अभिनंदन केले आहे.