
सावंतवाडी : सावंतवाडीत न.प. निवडणूक जाहीर झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ताकतीने उतरला आहे. महाविकास आघाडीसाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. निश्चित त्यात यश मिळेल. उद्या आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मठकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी माहिती उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. राऊळ म्हणाले, महाविकास आघाडी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शेवटपर्यंत आम्ही तसे प्रयत्न करणार आहोत. मनसे, वंचित आघाडीशीही चर्चा सुरू आहे. एकत्र लढावं ही इच्छा असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मठकर यांचा फॉर्म आम्ही उद्या भरणार आहोत. माजी खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश देखील होणार आहे. सौ. मठकर यांच सावंतवाडी शहराशी नातं आहे. माजी आमदार कै. जयानंद मठकर यांचा वारसा त्यांना लाभला आहे, असं मत व्यक्त केले.
तसेच महाविकास आघाडीचेही घटक पक्ष त्यांच्यासोबत राहतील. सावंतवाडी शहराचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहरासाठी योगदान देण्यावर आमचा भर आहे. आमच्याकडे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. महाविकास आघाडीची साथ आहे. त्यामुळे प्रवेशाच्या रांगा लावायची आवश्यकता नाही. साक्षी वंजारी या कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा आहेत. त्यांचा पक्ष त्यांच्या मागणीवर निर्णय घेईल. महाविकास आघाडीतून सीमा मठकर का हव्यात ? यासाठीची चर्चा आम्ही देखील केली आहे. आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ, आमच्याकडे भांडण नाहीत. एकदिलाने निवडणूकीला सामोरे जाऊ असा विश्वास उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केला. यावेळी माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, शब्बीर मणियार, समिरा खलील, आशिष सुभेदार, कृतिका कोरगावकर आदी उपस्थित होते.










