
सावंतवाडी : नेत्रदत्त सृष्टीदर्शन म्हणजे पर्यावरणाला पूरक व सुरेख संदेश देणारी अनुभूती आहे. डॉ. नेत्रा सावंत तसेच ज्येष्ठ चित्रकार श्री हरेकृष्ण भगवान व विश्राम भगवान यांनी अतिशय सुबकरित्या केलेली पेंटिंग मनाला वेधून घेणारी आहेत. येथील चित्रे पर्यावरण संरक्षण आणि आपल्या जीवनात आध्यात्मिकता आणण्याचे महान कार्य करीत आहेत, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले.
सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात 'नेत्रदत्त' सृष्टीदर्शन या डॉ. नेत्रा दत्तात्रय सावंत, श्री हरेकृष्ण भगवान व विश्राम भगवान यांच्या चित्रांचे सामूहिक चित्र प्रदर्शन व विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील तसेच प्रमुख अतिथी म्हणून सौ व श्री. डॉ. जयेंद्र परुळेकर, सौ व श्री. राजेश नवांगुळ, सौ व श्री. डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, सौ व श्री. डॉ. उमेश मसूरकर, सौ व श्री. अच्युत सावंतभोसले सौ व श्री. विक्रम भांगले उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास डॉ. दत्तात्रय सावंत, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बोर्डेकर, ॲड. स्वप्निल प्रभू आजगावकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश बोंद्रे, सीताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, विजय देसाई, ॲड. संतोष सावंत, प्रा. रुपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी डॉ. नेत्रा सावंत व डॉ. दत्तात्रय सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर दीप प्रज्वलन व गणेशाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी या सुंदर प्रदर्शनाचा सावंतवाडीकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. जयंत परुळेकर यांनी केले.हे प्रदर्शन व विक्री दिनांक २ ते ४ मे दरम्यान सर्वांसाठी खुले असून प्रदर्शन स्थळी चित्रांची विक्रीही केली जाणार आहे. तरी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे डॉ. नेत्रा सावंत, हरेकृष्ण भगवान, विश्राम भगवान यांनी सांगितले.