माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केला सुषमा मांजरेकर, दीपक डवर यांचा सन्मान

Edited by: विनायक गांवस
Published on: March 30, 2024 06:07 AM
views 102  views

सावंतवाडी : नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेल्या विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसच्या शिक्षिका सुषमा प्रवीण मांजरेकर व सौंदाले जि. प. शाळेचे शिक्षक दीपक डवर यांचा सत्कार केला. प्रा. सौ.मांजरेकर व डवर या दोन्ही पुरस्कर प्राप्त शिक्षकांचे शिक्षणाधिकारी सौ. शिंपी यांनी कौतुक करुन यापुढेही चाकोरीबाहेर शैक्षणिक काम करुन जिल्ह्याचा राज्यात नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले.

यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे, जिल्हाध्यक्ष शिवराज सावंत,  सरचिटणीस संदीप शिंदे, शिक्षक नेते शरद नारकर आदी उपस्थित होते. यावेळी पुरस्कर प्राप्त शिक्षकांच्या विविध समस्येकडे संघटनेने लक्ष वेधले. शिक्षण विभागाच्या विविध समित्यांवर राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना स्थान देण्यात यावे, तक्रार निवारण समित्यांमध्ये स्थान द्यावे आदी समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी शिक्षणाधिकारी शिंपी म्हणाल्या, पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक ही शिक्षण विभागाची शान आहे. त्यांचा निश्चितच मान राखला जाईल. शिक्षण विभागाच्या विविध समित्यांवर जिल्ह्यातील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना निश्चितच स्थान दिले जाईल. तसेच अन्य मागण्यांबाबतही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हाध्यक्ष शिवराज सावंत यांनी आभार मानले.