देवगड किनारपट्टी 'पाहुण्यां'नी गजबजली !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 20, 2023 20:09 PM
views 60  views

देवगड : देवगड किनारपट्टीवर सीगल पक्षी Seagull Birdअवतरले असून, त्यांच्या येण्याने देवगड तालुक्यातील सर्वच समुद्रकिनारे गजबजले आहेत.पडवणेच्या किनाऱ्यावर रपेट मारताना सीगल पक्ष्यांचे थवे दिसू लागल्याने पर्यटकांना ते आकर्षण ठरत असून या थव्यांचे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.

किनाऱ्याला थवेच्या थवे येऊन बसतात आणि येणाऱ्या लाटांमध्ये मज्जा करत असतात. विशेषतःसकाळी या पक्ष्यांची गजबज पाहताना एक वेगळीच गंमत वाटते. सीगल पक्ष्यांच्या लयबद्ध हालचाली,भक्ष्य म्हणून छोटे मासे व खेकडे पकडण्यासाठीची शिताफी, आकाशात विहारण्याची शैली पाहता प्रत्यक्षदर्शीची करमणूक होत आहे.

या पक्ष्यांच्या हवेतील सहजसुंदर कसरती देखील पाहण्याजोगा असून या कसरती पाहण्यासाठी अनेकांची पावले समुद्र किनाऱ्यावर वळतात.यावर्षीही या पक्ष्यांचे आगमन झाल्याने समुद्र किनारा पक्ष्यांच्या सफेद रंगाने न्हाऊन निघाला आहे. पुढील दोन-तीन महिने देवगड समुद्र किनारे या पक्ष्यांनी फुलून जाणार आहेत.

थंडीच्या कालावधीमध्ये पुरेसे खाद्य आणि राहण्यासाठी अनुकूल असलेल्या परिसरात सीगल पक्षी स्थलांतर करून येथे दाखल होतात. दिवाळी सुटीमुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक देवगड येथे दाखल झाले आहेत. या पर्यटकांसाठी सीगल पक्षी म्हणजे पर्वणी ठरत आहे.