
वैभववाडी : विज्ञानामुळे मानवी जिवनात अनेक प्रगती झाली आहे. जगात आज झालेलं बदल हे विज्ञानामुळेच झाले आहेत. भारत देशही जगासोबत यामुळे स्पर्धा करू लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून शिक्षण घेतले पाहिजे असं मत गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांनी व्यक्त केले.
कोकीसरे माधवराव पवार विद्यालयात तालुकास्तरीय ५२ व्या विज्ञान प्रदर्शनाचे आज (ता.१२) उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, सरपंच समिक्षा पाटणकर, रविंद्र नारकर, विस्तार अधिकारी विशाल चौगुले, मुख्याध्यापक शिवदास कदम, केंद्र प्रमुख गौतम तांबे, प्रकाश नारकर, सुरेंद्र साळुंखे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
श्री जंगले म्हणाले, जग हे विज्ञानामुळे जवळ आले.अनेक नवनविन शोध लागत आहे. प्रत्येक क्षेत्रात यामुळे प्रगती झाली आहे. ही प्रगती देशाची आर्थिक स्थिती सुधारत आहे. आज आपल्या देशातही विज्ञानाच्या माध्यमातून अनेक क्षेपणास्त्र विकसित करण्यात आली. तसेच अंतराळातही आपण झेप घेतली. हे सर्व विज्ञानामुळेच शक्य झाले. भारताच्या या प्रगतीमुळे बरेचसे देश आपल्याला दचकून आहेत. विद्यार्थांनी आपल्या शालेय जीवनापासून वैज्ञानिक दृष्टिकोन जपला पाहिजे. अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून कणखर संशोधन बनले पाहीजेत असा आशावाद श्री.जंगले यांनी व्यक्त केला.
सुधीर नकाशे म्हणाले, भौगोलिकदृष्ट्या प्रतिकूल असणाऱ्या या तालुक्यात सर्व शिक्षक बांधव मोठ्या कष्टाने विद्यार्थी घडविण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या मेहनतीमुळे येथील विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी होत आहे. याचा आम्हा लोकप्रतिनिधींना अभिमान आहे. येथील विद्यार्थ्यांची अशीच प्रगती होण्यासाठी ज्या ज्या वेळी मदत लागेल, तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही ती पुर्ण करण्यासाठी सदैव आपल्या सोबत असू खासदार व आमदार यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रासंबधी प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन श्री नकाशे यांनी दिले. यावेळी मुकुंद शिनगारे, गौतम तांबे, संदीप राठोड, रविंद्र नारकर यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटील व आभार मुख्याध्यापक शिवदास कदम यांनी मानले.