कणकवलीच्या मुली हुशार !

उच्च प्राथमिक गटात तालुक्यात प्रथम
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 16, 2023 13:08 PM
views 358  views

कणकवली : येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक तीनच्या कुमारी संतोषी सुशांत आळवे हिने विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी प्रतिकृतीमध्ये उच्च प्राथमिक गटात कणकवली तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. नुकतेच वामनराव महाडिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेरे येथे 51 वे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनात संतोषी आळवेने सुरक्षित वाहतूक ही प्रतिकृती मांडली होती.


पावसाळ्यात कोकणात पडणाऱ्या धो-धो पावसामुळे नदीला येणारे पूर व त्यामुळे दोन गावांना जोडणाऱ्या छोट्या पुलावर जे पाणी भरते त्यावेळी पुलावरून वाहतूक केल्यास जीवित वित्तहानी होऊ शकते हे माहीत असूनही काही लोक अशी धोकादायक वाहतूक करतात. त्याला प्रतिबंध व्हावा यासाठी करण्यात आलेली उपाययोजना या प्रतिकृतीत दर्शवली होती. संतोषीला कणकवली क्रमांक तीनच्या विज्ञान शिक्षिका श्रीमती प्रतिभा कोतवाल यांनी मार्गदर्शन केले होते.


तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये कुमारी गाथा अमोल कांबळे हिने उच्च प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थिनींनी संपादित केलेल्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा करंबेळकर तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी त्यांचे खास अभिनंदन केले आहे. शाळेने मिळवलेल्या या उज्वल यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश चव्हाण, उपाध्यक्ष सौ सायली राणे तसेच सर्व सदस्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. सर्व पालक वर्गातूनही या विद्यार्थिनींचे खूप कौतुक होत आहे.