LIVE UPDATES

गोव्याकडे ओढा ; दोडामार्गातील शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर

शिक्षण व्यवस्थेच्या उदासीनतेने घोटला गळा
Edited by: लवू परब
Published on: June 03, 2026 16:21 PM
views 859  views

बैठकीला केवळ दोनच पालक 

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील मराठी माध्यमाच्या शाळा आज अस्तित्वाच्या संकटात सापडल्या असून, त्याला शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. लगतच्या गोवा राज्यात दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने तालुक्यातील अनेक विद्यार्थी गोव्यातील शाळांकडे वळत आहेत. परिणामी मराठी शाळांमधील पटसंख्या सातत्याने घटत असून अनेक शाळांवर बंद होण्याची वेळ आली आहे.

या पार्श्वभूमीवर बुधवारी दोडामार्ग महाविद्यालयात पालक, शिक्षक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला अवघे दोन पालक आणि काही शिक्षक उपस्थित राहिल्याने मराठी शाळांच्या प्रश्नांबाबतची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली.

बैठकीत उपस्थित पालकांनी शिक्षण व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ एक-दोन शिक्षक असतात. शाळांची इमारत जीर्ण झाली आहे. छत गळती, स्लॅब कोसळण्यासारखे प्रकार घडत असताना मुलांचे भविष्य अशा शाळांमध्ये का घालवायचे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पालकांनी सांगितले की, दर्जेदार शिक्षणाच्या शोधात अनेक कुटुंबे आपल्या मुलांना गोव्यातील शाळांमध्ये पाठवत आहेत. तेथील शाळांच्या बस आणि बालरथ विद्यार्थ्यांना घरापर्यंत येऊन घेऊन जात असल्याने पालकांचाही कल त्या दिशेने वाढला आहे.

"लोकप्रतिनिधींना प्रश्नाचे गांभीर्य नाही" : बाबूराव धुरी

बैठकीत बोलताना उबाठाचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर टीका केली. "तालुक्यातील मराठी शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. हा अत्यंत गंभीर विषय असतानाही ना जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते, ना पंचायत समिती सदस्य. ज्यांना आपण निवडून दिले त्यांनी अशा प्रश्नांवर पुढाकार घेणे अपेक्षित आहे," असे ते म्हणाले.

शिक्षकांच्या मुलांबाबतही उपस्थित झाला प्रश्न

बैठकीत काही पालकांनी शिक्षकांनाही धारेवर धरले. "मराठी शाळांमध्ये शिकवणाऱ्या अनेक शिक्षकांची स्वतःची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात. मग सामान्य पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत का ठेवावे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठी शिक्षणाबाबत विश्वास निर्माण करायचा असेल तर शिक्षकांनीही आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, राज्यभरातही मराठी आणि सरकारी शाळांमधील घटती पटसंख्या हा चिंतेचा विषय बनला असून शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील प्रवेशसंख्या सातत्याने घटत असल्याचे चित्र आहे.

मराठी शाळांचे अस्तित्व टिकवायचे असेल तर शिक्षणाचा दर्जा, पायाभूत सुविधा आणि पालकांचा विश्वास या तिन्ही आघाड्यांवर तातडीने काम करण्याची गरज असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.