LIVE UPDATES

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान

समितीवर रवी जाधव - विनायक गांवस यांची निवड
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 24, 2026 12:03 PM
views 51  views

सावंतवाडी : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गावागावांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी शासनातर्फे 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, नियोजनासाठी आणि सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय कृती दल समिती गठीत करण्यात आली आहे. या अधिकृत समितीवर सदस्य म्हणून रवी जाधव आणि कोकणसादचे चीफ रिपोर्टर विनायक गांवस यांची निवड करण्यात आली आहे.

​सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय सेवा देणारे रवी जाधव यांची 'सदस्य तथा एनजीओ (NGO) प्रतिनिधी' म्हणून निवड झाली आहे. तर, पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे विनायक गांवस यांची 'सदस्य तथा पत्रकार संघ प्रतिनिधी' म्हणून या तालुकास्तरीय कृती दलावर शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

​या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा दर्जा उंचावणे आणि तळागाळातील लोकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे यावर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. दरम्यान, शासनाच्या कर्मचारी प्रतिनिधींनी नवनियुक्त सदस्य रवी जाधव व विनायक गांवस यांच्याकडून आरोग्य अभियानाच्या यशस्वीतेसाठी मोठ्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली असून, त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. या दोघांच्या निवडीबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.