शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघात शाळा बंद आंदोलन

केसरकर शिक्षणमंत्री म्हणून अपयशी ठरले : अर्चना घारे-परब
Edited by: विनायक गावस
Published on: August 03, 2023 14:30 PM
views 353  views

सावंतवाडी : स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या चुकीच्या धोरणामुळे आज त्यांच्यांच मतदारसंघातील तालुक्यात शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांना व पालकांना शाळा बंद आंदोलन छेडावे लागत आहे हे दुर्देव आहे. दीपक केसरकर शिक्षण मंत्री म्हणून अपयशी ठरलेत हे यावरून सिद्ध होते आहे. त्यांनी वेळीच ही परिस्थिती सुधारावी अन्यथा मंत्री केसरकर यांच्याच निवासस्थानासमोर विद्यार्थी पालकांना घेऊन आंदोलन छेडावे लागेल असा इशारा राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महीला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी दिला आहे.


कुणकेरी शाळा नंबर १ मध्ये शिक्षकांची दोन पदे रिक्त झाल्याने शिक्षक मिळावा या मागणीसाठी  विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने आज शाळा बंद आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांन भेट देऊन त्यांची समस्या जाणून घेत आंदोलनाला पाठिंबा दिला. 


यावेळी त्या म्हणाल्या, शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या निष्क्रियतेमुळे ही वेळ आज पालक व शिक्षकांवर आली आहे. यासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवूनही त्यांच्याकडून सुधारणा केली जात नाही ही खेदजनक बाब आहे. शिक्षकांसह ग्रामस्थ लोकप्रतिनिधी व विद्यार्थ्यांना यासाठी आंदोलन करावे लागते यापेक्षा दुर्दैव ते काय ? आज गावागावातून जनतेचा उद्रेक पाहायला मिळत असून वेळीच ही परिस्थिती सुधारावी अन्यथा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. वेळप्रसंगी मंत्र्याच्याच घरासमोर आंदोलन छेडावे लागेल असा इशारा अर्चना घारेंनी दिला.


दरम्यान रिक्त असलेल्या दोन पदवीधर शिक्षकांच्या जागी एक तरी पदवीधर शिक्षक मिळावा, तो मिळत नाही तोवर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. जोपर्यंत शिक्षक उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे असा इशारा ही शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजन मडवळ यांनी दिला. 


दरम्यान, पत्रव्यवहार करूनही अधिकारी इथे आलेली नाहीत याचा अर्थ शिक्षणाचं त्यांना महत्व नाही. आमच्या सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची ही मुलं आहेत. मुलांना शहराच्या ठिकाणी त्यांना पाठवायची आमची ऐपत नाही. प्राथमिक शाळा बंद झाल्या तर आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय ? याच उत्तर शिक्षणमंत्र्यांनी द्यावं. तर मोठ्या शहराला पाणी पुरवठा हा आमच्या गावातून होतो. आम्ही काही उपकार करत नाही परंतु त्या पाण्याची जाण मंत्र्यांनी ठेवून कुणकेरी गावावर लक्ष द्यायला हवा होता अशी तीव्र भावना कुणकेरी ग्रामस्थांन व्यक्त केली. 


इंग्रजी, गणित या विषयाचे शिक्षक शाळेत नाहीत‌. त्यामुळे अर्ध शिक्षण राहत. आम्हाला पदवीधर शिक्षक पाहिजेत. चांगल शिक्षण पाहिजे असं मत शालेय विद्यार्थ्यांन व्यक्त केले आहे.


यावेळी कुणकेरी सरपंच सोनिया सावंत, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष राजन मडवळ, सूर्यकांत सावंत, मंगेश सावंत ,आनंद गावडे, भरत सावंत, विश्राम सावंत, अनुराग गावडे, सुहास गावडे, योगेश परब,आनंद मिस्त्री, गुरु कुणकेकर, महेश गावडे, दीपक सावंत, राष्ट्रवादीच्या सावली पाटकर आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.