
सावंतवाडी : भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान संचालित शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि नॅशनल सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या हिंदी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून इयत्ता आठवीचा विद्यार्थी प्रणित मेस्त्री याने शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ५६ वा क्रमांक मिळवत शिष्यवृत्तीचा मानकरी ठरला आहे.
यासोबतच हिंदी ऑलिंपियाड परीक्षेत इयत्ता आठवीची विद्यार्थिनी सानवी गावडे हिने द्वितीय स्तरावरील परीक्षेत कोकण विभागात द्वितीय क्रमांक पटकावला. तिला रौप्यपदक आणि रुपये २ हजार ५०० ची शिष्यवृत्ती मिळाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यकारी संचालक विक्रांत सावंत, उपाध्यक्ष नारायण देवरकर, सचिव व्ही. बी. नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब नंदीहळी, मुख्याध्यापक समीर परब आणि संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.