सावंतवाडीची मुक्ताई अकॅडेमी सर्वोत्कृष्ट!

सांगली येथे पुरस्कार प्रदान
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 17, 2022 12:20 PM
views 346  views

सावंतवाडी : शहरातील मुक्ताई अकॅडेमीला सांगली येथे सर्वोत्कृष्ट अकॅडेमीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कै. मदनभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या खुल्या बुद्धीबळ स्पर्धेच्या समारोप प्रसंगी मुक्ताई अकॅडेमीचा सन्मान करण्यात आला.

गेली सात वर्षे विद्यार्थ्यांसाठी मुक्ताई अकॅडेमी विविध क्रीडा प्रकार आणि इतर सामाजिक उपक्रमात कार्यरत आहे. सर्वोत्कृष्ट अकॅडेमीचा पुरस्कार मिळवणारी कोकणातील ही पहिलीच अकॅडेमी ठरली आहे.

सांगलीतील स्पर्धेसोबतच बेळगावमधील कै. निंगाप्पा आणि कोल्हापूरमधील कै. श्रीपाद कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धांमध्ये

अकॅडेमीच्या जिल्हाभरातील सोळा विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, ट्राॅफी, प्रशस्तीपत्रे देण्यात आली. विजेते राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, विभव राऊळ, भावेश कुडतरकर, यश सावंत, भूमी कामत, गार्गी सावंत यांच्यासह राजेश विरनोडकर, साक्षी रामदूरकर, विधी पाटील, उत्कर्षा परब, प्रतिक देसाई, आयुष राठोड, कुडाळमधील अर्श  पोटफोडे, अनुज व्हनमाने, वेंगुर्ला येथील साईश केरकर या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी स्पर्धेत सहभाग घेतला.

विशेष कौतुक म्हणजे पन्नास टक्के दृष्टिदोष असलेला मालवण येथील अकॅडेमीचा विद्यार्थी मयुुरेेश परुळेकर याने पहिल्यांदाच या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन गटामधील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची पारितोषिके पटकावली. प्रत्येक स्पर्धेत सात ते आठ राज्यातील जवळपास ३०० ते ३५० खेळाडूंचा सहभाग होता.

अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी बुद्धीबळ सोबतच कॅरम, टेबल टेनिसच्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पारितोषिके मिळवली आहेत. कॅरम खेळाडू साक्षी रामदूरकर, क्षीतिजा मुंबरकर, आस्था लोंढे, पर्णवी म्हापसेकर, यशराज गवंडे, भावेश कुडतरकर आणि बुद्धीबळ खेळाडूंची शालेय स्पर्धांमध्ये विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मुक्ताई अकॅडेमीचे अध्यक्ष व प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि बुद्धीबळ राष्ट्रीय प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे यांचे सर्व विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन मिळत आहे.