
सावंतवाडी : रुपेश राऊळ यांनी विनाकारण आमदार दीपक केसरकर यांची बदनामी करू नये. अन्यथा, त्यांना उघडे पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुमची कुंडली बाहेर काढू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिला.
परब पुढे म्हणाले, रुपेश राऊळ यांनी दीपक केसरकर यांचे नाव घेऊन आरोप करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, आजपर्यंत ते स्वतः केसरकर यांच्या जीवावरच राजकारण करून आपलं पोट भरत होते. उगाच आरोप करून काहीतरी मिळवणे, हाच त्यांचा धंदा आहे. गेली पंचवीस वर्षे राजकारण करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचा अधिकृत व्यवसाय जनतेसमोर मांडावा आणि त्यानंतरच दीपक केसरकर यांच्यावर बोलावे. लोकांना सर्व माहिती आहे. त्यामुळे उगाच आम्हाला बोलायला भाग पाडू नये. विनाकारण आरोप सुरू ठेवल्यास रुपेश राऊळ यांची संपूर्ण कुंडली बाहेर काढू, असा इशाराही संजू परब यांनी दिला आहे. तसेच आडाळी एमआयडीसीतील माती चोरी प्रकरणात लवकरच तुम्हाला उद्योग मंत्र्यांकडून कारवाई केल्याच पाहायला मिळेल असं देखील परब यांनी स्पष्ट केले. यावेळी सावंतवाडी सभापती सुस्मिता जाधव, दोडामार्ग उपसभापती गणेशप्रसाद गवस, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, नगरसेविका ॲड सायली दुभाषी आदी उपस्थित होते.










