जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी हाताला लावल्या काळ्या फिती

असं काय घडलं..?
Edited by: विनायक गांवस
Published on: May 15, 2026 15:36 PM
views 21  views

सावंतवाडी : ऑनलाईन औषध विक्रीला विरोध, कॉर्पोरेट कंपन्यांची शोषणात्मक किंमत धोरणे आणि बनावट औषधांचा धोका यांविरुद्ध अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने देशव्यापी लढा पुकारला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २० मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते २४ तासांचा कडकडीत बंद पाळणार‌ असून शुक्रवारपासून सावंतवाडीत काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आला.

सावंतवाडी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. आजपासून १९ मे पर्यंत सर्व औषध दुकानांतील मालक, फार्मासिस्ट आणि कर्मचारी हाताला काळ्या फिती लावून काम करत आपला निषेध नोंदवत आहेत. १९ मे च्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २० मे च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहे. ऑनलाईन औषध विक्रीवर त्वरित बंदी घालावी, २६ मार्च २०२० ची अधिसूचना केंद्र सरकारने मागे घ्यावी, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून राबवली जाणारी अवास्तव डिस्काउंट धोरणे बंद व्हावीत, बनावट औषधांच्या विक्रीपासून देशातील जनतेला वाचवावे आदी मागण्या यानिमित्ताने करण्यात आल्यात.‌ यावेळी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने या संदर्भात पंतप्रधानांना निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हा बंद पुकारण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. औषध विक्रेत्यांचे हे आंदोलन देशहितासाठी आणि रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आहे असं मत सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष आनंद रासम यांनी व्यक्त केले आहे. तसेच बंद काळात सर्व दुकाने बंद राहणार असली तरी आपत्कालीन स्थितीत रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी संघटनेने खबरदारी घेतली आहे अशीही माहिती त्यांनी दिली.