
देवगड : येणाऱ्या पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सक्षम व सतर्क राहावी यासाठी पंचायत समिती देवगड सभापती गणेश राणे व उपसभापती अमोल लोके यांनी देवगड ग्रामीण रुग्णालयास भेट देत विविध विभागांची पाहणी केली. यावेळी रुग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध ठेवून आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील औषधसाठा, स्वच्छता व्यवस्था, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपलब्धता, रुग्णसेवा तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच रुग्णालयातील डायलेसिस यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेण्यात आली. डायलेसिस विभागातील सेवा अधिक प्रभावीपणे सुरू राहाव्यात, यासाठी आवश्यक त्या बाबींकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
सभापती गणेश राणे यांनी पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी असे सांगितले. तर उपसभापती अमोल लोके यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असून रुग्णालय प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असे मत व्यक्त केले. दरम्यान, रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. तसेच रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांबाबत माहिती घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.











