
सिंधुदुर्गनगरी : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना तब्बल २० हजार पेक्षा जास्त दाखले द्यावे लागणे याचे प्रशासनाने आत्मचिंतन करावे. प्रशासन लोकांना सेवा देण्यास कमी पडत होते हेच या आकडेवारीवरून दिसून येते. दाखल्यांचा आकडा ज्यावेळी शून्यावर येईल तेव्हाच आपण गतिमान प्रशासन म्हणू अशा कडक शब्दात पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाची कानउघडणी केली. दरम्यान भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरे किंवा कार्यक्रम घेण्याची वेळ येणार नाही असे आश्वासन देखील राणे यांनी उपस्थित नागरिकांना दिले.
छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात पार पडला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, कुडाळ प्रांत ऐश्वर्या काळुसे , तहसीलदार सचिन पाटील, नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, नागरिकांना विविध प्रकारचे दाखले वाटप करणारा कार्यक्रम हा समाधान देणारा आहे.प्रशासन पारदर्शक असावे, नागरिकांना फार कमी वेळेत दाखले मिळावे व नागरिक समाधानी होऊन घरी परतावा हा उद्देश समोर ठेऊन समाधान शिबिर सुरू केले आहे. प्रशासनामध्ये आत्मविश्वास वाढविणारे हे शिबिर आहे. दाखला हा नागरिकांच्या जीवनात परिवर्तन आणू शकतो. विविध लाभ मिळवून देऊ शकतो. प्रशासनाचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी प्रयत्न केले. लोकाभिमुख कारभार असावा म्हणून काम केले. परंतु चालू शिबिरामध्ये २१ हजार २०१ दाखले नागरिकांना देणे हे भूषणावह नाही. कारण एवढ्या लोकांना लाभापासून वंचित ठेवले गेले म्हणून प्रशासनाने या गोष्टीचे आत्मचिंतन करावे. सध्याचा कारभार हा गतिमान पद्धतीने सुरू आहे. प्रत्येक आव्हानाला तोंड देणे,प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे या बाबींमुळे भविष्यात पेंडिंग दाखल्याची आकडेवारी ही शून्य असेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानाची माहिती दिली. गेल्या तीन महिन्यांपासून हे अभियान आपल्या जिल्ह्यात सुरू आहे. या माध्यमातून नागरिकांना अकरा महसुली सेवा देण्यात आल्या आहेत.











